Wednesday 28 September 2011

स्वगत संवाद - १२

आज अगदी अनपेक्षितपणे एक अनोखा अनुभव घेतला.  अनोखा हा शब्दप्रयोग मी माझ्या मर्यादित भावविश्वापुरत्या संदर्भात वापरतो आहे.  एरवी जी घटना सांगतो आहे ती काही फार जगावेगळी मुळीच नाही. घडलं एवढच की आज प्रथमच  एका चित्रकारासमोर पोर्ट्रेटसाठी सिटींग दिलं.  मलाही प्रत्यक्ष त्यासाठी बसण्यापूर्वी फार काही थरारक वाटलं नव्हतं. किंबहुना आत्ताही तसं काही वाटत नाही आहे.  पण तरीही प्रत्यक्ष ते चालू असताना ते मी खूप एंजॉय केलं .. अर्थात  ह्यामागेही एक छोटीशी पार्श्वभूमी (नेहमीप्रमाणे) आहेच.

बरेच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.  मित्र विजय कुवळेकर तेव्हां कोल्हापूर सकाळचा संपादक होता. आणि म्हणून कोल्हापूरला रहायचा.  शिवाय तिथं एक जिगरी  दोस्त होताच. डॉ. अविनाश जोशी .. अविनाशची माझी ओळख मी पुण्यात आलो त्याच वर्षी मनोहर साप्ताहिकातर्फे  झालेल्या एका शिबिरात झाली होती.  त्या ओळखीचं रूपांतर पुढे घट्ट मैत्रीत झालं.. त्याच्यामुळेच माझा कोल्हापूरशी आजतागायत सुरू असलेला खोल ऋणानुबंध सुरू झाला.  त्याचा नागाळा पार्कमधला देखणा बंगला हा  तेव्हाचा माझा कायम विसावा होता. अविनाश व्यवसायानं डॉक्टर पण आंतून विलक्षण कलासक्त... साहित्य-नाटक-चित्रपट-संगीत ह्याबरोबरच चित्र आणि शिल्प ही त्याची वेडं होती.  गंमत म्हणजे त्यांत स्वत:ला काही गती असण्या अथवा नसण्याचा मुद्दाच त्याच्या संदर्भात संभवत नव्हता.  त्यातील कलाकारांवर तो जिवापाड प्रेम करायचा. त्यांत उगवत्या कलाकारापासून अगदी ज्येष्ठ नामवंतापर्यंत सर्वांकडे त्याचा अखंड राबता असायचा. आणि त्याही लहान थोर कलाकारानां ह्या उमद्या व्यक्तित्वाची ओढ असायची. नाटक, चित्रपट आणि त्यामुळे संगीत हे सगळे त्याची जिव्हाळ्याचे विषय होतेच.  पण मला उगीचच आश्चर्य वाटायचं ते, त्याला असलेल्या चित्रकला आणि शिल्पकला ह्या दोन्हीच्या वेडाच ..त्याच्या रोजच्या  दिनक्रमात  क्लिनिकमध्ये जाता येतां रवींद्र मेस्त्रीच्या स्टुडियोत जाउन त्यांचं त्या त्या वेळी सुरू असलेलं चित्र किंवा शिल्प घडताना पहात बसणं हे जणू त्याचं व्रत असावं इतक्या इमानाने तो ते पाळायचा. रवींद्रजीनाही त्याचं खूप अगत्य होतं.   पन्हाळ्यावर त्यांनी बनवलेला बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा पूर्णाकृती पुतळा नजरबंदी करणारा आहे.  पण त्याचं मूळ प्लास्टर ऑफ पेरिस मधलं मस्तक अविनाशच्या दिवाणखान्यात त्यानं दिमाखात  मांडून ठेवलं होतं. तर अशा ह्या कलासक्त अविनाशच्या घरी मी विख्यात चित्र-ऋषी श्री. कें. बी  कुलकर्णीनां प्रथम भेटलो. 

बेळगाव-धारवाडकडचे कें.बी.कुलकर्णी ह्या नांवाचा दबदबा मी खूप दिवस ऐकून होतो. चित्रकार रवि परांजपे आणि जॉन फर्नाडीस ह्यांचे ते गुरू.  मुंबईला नाट्य संपदाच्या कार्यालयात एक सुंदर पोर्ट्रेट लावलेलं होतं.  एक खूप वेधक, मोहक स्त्री सौंदर्य त्या चित्रात रेखीत केलेलं होतं.  मी न राहवून प्रभाकर पणशीकरांना हे चित्र कुणी केलंय म्हणून विचारलं आणि त्यांनी अपूर्वाईनं मला सांगितलं,  बेळगावचे कें. बी. कुलकर्णी . माझ्या आयुष्यातला तो कें.बी.चा पहिला प्रवेश..  विजय कुवळेकरही त्यांच्याबद्दल नेहमी भरभरून बोलायचा.  अशा हया पार्श्वभूमीवर कें.बी. मला अविनाशकडे दोस्तांच्या कोंडाळ्यात प्रथम भेटले.   माझ्या डोळ्यासमोर त्याचं कसलंही कल्पनाचित्र तोवर उभं राहिलं नव्हतं.  पण ते मला दिसण्या-वागण्यासह खूप आवडले.  त्यांची चित्र  आणि ते स्वत: ह्यामध्ये एक संगती होती.  साधेपणाची, सहजतेची, स्वाभाविकतेची..  मला कां कुणास ठाउक त्यांना पहातांना तेव्हां नुकत्याच काळाच्या पडद्याआड गेलेल्या आमच्या पी. आर. शिंदेसरकारांची आठवण झाली.  त्यामुळं मी काही न बोलता त्यांना केवळ न्यहाळत होतो.  विजय कुवळेकर, चंद्रकांत जोशी, अविनाश सगळेच त्याच्या खूप जवळचे, त्यामुळं थट्टा मस्करीत मैफिल रंगत होती.  विजय मधेच मिस्कीलपणे म्हणाला.  आमच्यासारखे देखणे चेहरे समोर आहेत पण कें.बी काही आमचं पोर्ट्रेट करीत नाहीत.  कें.बी.ही गंमतीने आणि तरीही मन:पूर्वक म्हणाले..  काय आहे, नुसता देखणा चेहरा असून होत नाही ..त्या चेह-यात काहीतरी आणखी असावं लागतं.. हा चेहरा बघा..  आणि अगदी अनपेक्षितपणे त्यांचं बोट  त्यांनी माझ्याकडे वळवलं .. ..स्वत:च्या रूपांविषयी कसलेही गोंडस गैरसमज माझे तेव्हाही नव्हते आणि आजही नाहीत.. पण तरीही आरपार मोहरलो होतो. एका चित्रकारानं आपली निवड केली हाच अपूर्व आनंद होता.  प्रत्यक्षात तो योग आला नाही, पण तरीही त्या क्षणाचा  तो आनंद इतक्या वर्षात कणभरही ओसरलेला नाही. 

त्यानंतर बरेच वर्षांनी अगदी अलीकडे, एका चित्र-प्रदर्शनात भेटलेल्या एका तेव्हां अनोळखी असलेल्या चित्रकार कलावतीनं ह्याच उद्गाराची पुनरुक्ती केली होती.  सर, मला तुमचं पोर्ट्रेट करायला आवडेल. मी ते हसून सोडून दिलं होतं.  अगदी अलीकडे चित्रकार बुवा शेटेशी ओळख झाली.. त्या पहिल्या काही भेटीतच ते मला म्हणाले होते, मला तुमचं पोर्ट्रेट करायला आवडेल.. अर्थात माझ्या पद्धतीनं हं .. आता तर ते माझे सख्खे शेजारी आहेत.. पण तो योग प्रत्यक्षात येण्याचा  सुयोग अजून जुळलेला नाही.  कारण ह्या गोष्टी मुद्दाम ठरवून होत नाहीत, त्या आपसूक घडाव्या लागतात.. तसं अगदी अलीकडे उल्हास जोशीनं माझं अप्रतीम पोर्ट्रेट केलं..मात्र ते कुमार गोखलेंनी काढलेल्या एका चायाचित्रावरून . दुसरं रघुवीर कुलनी समोर काही न ठेवता माझं एक शंभर टक्के इम्प्रेशनिसट असं चित्र केलं आहे. दोन्ही  मुक्तछंदमधील माझ्या मेकशिफ्ट स्टुडियोत ही लटकली आहेत.. सुंदर कलाकृती म्हणून,  माझी छबी म्हणून नक्कीच नव्हे..  अगदी ह्या सर्व पार्श्वभूमीवर नुकतीच ही घटना घडली.  .  . 

परवाच्या शनिवारी बालगंधर्व कला दालनात एका गुरुकुल पद्धतीच्या विद्यार्थी आणि गुरूच्या सहयोगातून एक प्रदर्शन भरलं होतं..  मी प्रमुख पाहुणा होतो.  नवीन चित्र पहायला मिळतात, जुने-नवे चित्रकार एकत्र भेटतात आणि मुख्य म्हणजे तो माहौल मनापासून आवडतो, म्हणूनचं केवळ प्रमुख पाहुणेपदाची अवजड झूल मी अंगावर घातली होती. सुदैवानं प्रदर्शनाचे उद्-घातक होते अहमदनगरचे विख्यात शिल्पकार, श्री. कांबळे.  पहिला औपचारिक समारंभ संपला.  त्यानंतर कांबळे ह्याचं प्रात्यक्षिक व्हायचं होतं.  पूर्व नियोजित कार्यक्रमामुळं मला निघणं भाग होतं आणि एक छान अनुभव हुकणार म्हणून हुरहूरही वाटत होती.  पण इलाज नव्हता.  मी ती पहिली सभा संपताच निघायच्या बेतात होतो.  तेव्हढ्यात कांबळेजी अनपेक्षितपणे म्हणाले.  मी सुधीर मोघेसाहेबांनाच माझ्या ह्या प्रात्यक्षीकासाठी निवडू इच्छितो.  मला तर निघण्याची घाई ..काय करावे कळेना. त्यावर स्वत: कलाकाराचे आर्जवी शब्द ...मी आत्ता शिल्प करत नाहीये.  आधी मी फक्त तुमचं एक स्केचमधील पोर्ट्रेट करणार आहे  ..केवळ पंधरा-वीस मिनिटं लागतील.. नकार देणं शक्यच नव्हतं.. आणि बरेच वर्षे हुकत असलेला एक योग अचानक पुढे ठाकलेला तो नाकारून जाणं हे करंटेपण ठरलं असतं.  अखेर थांबलो.   

सिनेमा नाटकात काही काळ वावरल्यामुळे पोझ देणे ह्या गोष्टीची नवलाई किंवा धास्ती नव्हती.  पण फोटोच्या एका स्नेपपुरतं वेगवेगळ्या पोझेस देणे आणि एकाचं पोझमध्ये सलग १५=२० मिनिटं अविचल बसणं हे अंमळ दिव्य वाटत होतं.  पण आता कुठे जाशील टोळम्-भट्ट ..म्हणत खुर्चीवर त्यांच्या आदेशानुसार बसलो.. आणि शरीर-मनाची एक मजेदार जोड प्रक्रिया सुरू झाली.   

मी माझ्याकडून खूप मन:पूर्वक ह्या अनुभवाला सामोरं जायचं असं क्षणात जणू कसलाही मुद्दाम विचार न करता ठरवलं.  आरंभी मन आणि शरीर ही दोन स्वतंत्र अस्तित्व एकमेकांशी नाठाळ वागतात की काय असं वाटत होतं.  बहुधा तसा त्यांचा बेत होताही.  पण कशी कोण जाणे ती हळूहळू हातात हात घालून चालू लागली ..खुर्चीवर बसताना थोडी अवघडलेली वाटणारी अवस्था विरघळून एक अपरिहार्य सहजता अंगोपांगी खेळू लागली.  मनातून एक प्रसन्नता उमलून एक मंद हास्य मुद्दाम न आणता जणू आंतूनच फुलून मुद्रेवर पसरू लागलं ..ते खूप स्पष्ट किंवा प्रकट नव्हतं...पण ते माझं मलाच आंतून जाणवत होतं, म्हणजे ते तिथं असणार असा एक दिलासा वाटत होता.  आता हे असंच टिकवायचं म्हणजे तद्दन नाटकीपणा, तो नको असं एकीकडे वाटत असताना तो ताण हलकेच ओसरला.. कारण एका अनामिक आनंदाच्या सूक्ष्म लहरी आंतून येउन ओठांवर   विरत होत्या.  आणि एक विरते तोवर दुसरी तिथे पोचत होती.  मी आंतल्या डोळ्यांनी जणू स्वत:लाच न्याहाळू लागलो होतो.  

हे घडत असतांना एकीकडे एक दुसरं सघन अस्तित्व डोळ्यासमोर आपला नियोजित प्रवास करीत होतं.  इतका वेळ माझ्या जवळ खुर्चीवर बसलेली व्यक्तीच प्रथम त्या ईझेलआडून माझ्याकडे  ओझरते कटाक्ष टाकीत पुन्हा इझिलकडे वळत होती. पण काही क्षणातच ती व्यक्तीही वेगळी होऊ लागली. विशेषत: ती नजर ..खूप त्रयस्थ पण तरीही माझ्यावर खिळलेली.. माझ्यात गुंतलेली... त्या नजरेतले भाव तसे तटस्थ होते पण तरीही क्षणाक्षणाला ते पालटत होते... पहाता पहाता ते माझ्यात आणि समोरच्या ईझेलमध्ये बुडत चालले होते.  म्हणजे एकीकडे मी माझ्यात आणि दुसरीकडे ते त्यांच्यात आणि तरीही काहीतरी संवाद घडत होता.. किंबहुना त्या संवादाच्या आधीन आम्ही दोघेही झालो आहोत की काय असं वाटत होतं.
                पुगीत गारुडी
                पेरित जाई प्राण
                डोलतो त्यावरी
                नाग भान हरपून
                जणू इंद्रजाल वीणतात स्वरांचे धागे
                विळख्यात गुंतले
                            नाग-गारुडी, दोघे ..
असं काहीतरी.. असा नक्की किती काळ गेला कुणास ठाउक ..एका क्षणी एक शेवटचा टच देउन ते इझेलपासून दूर झाले आणि पहाता पहाता स्वत:मध्ये सुखरूप परतले.  त्यापाठोपाठ काही क्षणांत मीही माझ्यामध्ये, पहिला होतो तसा, स्थापित झालेला मी स्वत: चाचपून तपासून पाहिला ..इतका वेळ चिडीचूप झालेला भोवताल पुन्हा सांवरून गजबजू लागला होता.. 
               काहीतरी पूर्ण झालं होतं.. काहीतरी हरवलंही होतं. 

२८ सप्टेंबर २०११, घटस्थापना.. वाई.            

Saturday 17 September 2011

स्वगत संवाद - ११

मला  वाटतं, आता उगीचच अनावश्यक फुटेज खाण्यापेक्षा आज त्या ध्वजगीताचीच गोष्ट सांगून टाकावी, हे अधिक बरं. नाही कां ?  तशी त्या गीताची गोष्ट अगदी छोटी आहे. पण त्याच्या मागेपुढे जे संदर्भ आहेत ते महत्वाचे आहेत.  माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या संदर्भात आणि एकूणातही.

पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा उल्लेख मी आत्तापर्यंत केला तसा ध्वजगीत म्हणून कधीच झाला नाही आणि होत नाही.  त्याला समस्त किर्लोस्करवाडीकर ध्वजाची आरती म्हणतात. त्यामुळं की काय वर्षानुवर्षे ती आरती गायली जात असताना सुवासिनी स्त्रिया हातात आरतीचं तबक घेउन ध्वजासमोर उभ्या असायच्या ..जुनी कृष्ण धवल छायाचित्र आजही ह्याची साक्ष देतात.. किर्लोस्कर उद्योग आणि गांव ह्यांच्या शतक महोत्सवानिमित्त मला एक अनुबोधकथापट करायची संधी गेल्या वर्षी मिळाली ..त्याचं शीर्षक आहे, आधी बीज एकले त्या चित्रपटात ही छायाचित्र पहायला मिळतात... तर ह्या गाण्याचे  मूळ निर्माते कवी रांम गणेश मोघे आणि संगीत दिग्दर्शक माणगावकर मास्तर ह्या दोघाविषयी आधी थोडक्यात सांगायला हवं. 

आमचे वडील जातिवंत कीर्तनकार होते. हे म्हटल्यावर त्यांच्यामध्ये कवित्व असणं हे ओघानंच आलं. पण त्यांचं ते कवित्व केवळ कामचलाऊ नव्हतं, तर चांगली अभिजात बैठक असलेलं होतं. त्यांचा कवितेचा अभ्यास प्राचीन काव्यापासून ते आधुनिक काळापर्यंत अत्यंत विस्तृत होता. पण त्यांचं स्वत:चं कवी-व्यक्तीत्व हे प्रामुख्यानं कीर्तनासाठी होतं.  शिवाय गांवाचे घटक म्हणून प्रासंगिक काव्यरचनाही त्यांनी खूप केल्या.. ही ध्वजाची आरती हा त्यातीलच एक  भाग म्हणावा लागेल.  मात्र  त्यांच्यातील कवित्वाचा दर्जा अत्यंत सकस आणि मुख्यत: प्रामाणिक होता. उसनेपणाचा स्पर्शही त्यांना कधी झाला नाही. ते लिहायचे ते मनाच्या तळापासून लिहायचे.  त्यांचा शब्दांचा साक्षेप समर्थ रामदास कवींच्या जातकुळीचा होता.  त्याची साक्ष देणारं त्यांच एक काव्यवचन हया ओघात सांगतो.  संधी हया विषयात ते म्हणतात.. 
                       संधी न येते बोलावूनी
                       संधी न राहते खोळंबूनी
                       संधी न लाभते,  सहसा, फिरुनी
                            ध्यानी धरावे ..
ह्या जागी जर दुसरा कुणी विचाराची बैठक नसलेला उतावळा आग्रही कवी असता तर त्यानं संधी न लाभते कधीही फिरुनी असंच म्हटलं असतं .. पण मूलभूत विचार आणि वस्तुस्थितीची डोळस जाणीव असल्यामुळे वडिलांनी  सहसा  हा अत्यंत समर्पक शब्द वापरला आहे.   आजकाल आपल्याला इंग्रजीमध्ये सांगितलं की अधिक नीट कळतं म्हणून सांगतो.. You will NEVER get the opportunity again हा आक्रस्ताळा आक्रमकपणा आणि    You  NORMALLY don’t get that again हे वास्तवाचं शहाणं भान हया दोन्हीतील सूक्ष्म छटा अवगत असण्याचा हा भाग आहे, ज्याला मी मघाशी शब्दांचा साक्षेप म्हटलं. 

आपल्या तिरंगी राष्ट्रध्वजाची ही आरती हा त्यांच्या अभिजात कवित्वाचा साक्षात प्रत्यय देईल. एकतर, कविवर्य गदिमांची  अशोक-चक्रान्कीता ही कविता हा    एकमेव नितांत सुंदर अपवाद वगळता मराठीत ध्वजस्तवन करणारं एकही अन्य उदाहरण निदान माझ्या तरी माहितीत नाही.  पुन्हा ह्या संदर्भातही एक तपशील ध्यानांत घ्यायला हवा. गदिमांनी ते  गीत १९६२ मध्ये चीन-भारत युद्धाच्या वेळी लिहिलं.. आणि रा.ग.मोघेंनी ही आरती १९४७ मध्ये पहिल्या स्वातंत्र्यदिनी लिहिली आहे. शिवाय त्यामध्ये ध्वजाच्या तीन रंगांमध्ये जो आशय शोधायचा प्रयत्न केला आहे तोही पहाण्यासारखा आहे...  तेव्हां,  आता ते कवितेचे शब्द पाहूया. 
              जय जय श्रीनवहिंदध्वजदेवा जय हो
              शांतीची,सौख्याची जगी तू प्रतिमा हो
                 वरचा केशरी रंग द्योतक त्यागाचा
                 धवलोज्वल रंग मध्ये द्योतक धैर्याचा
                 खाली हिरवा शोभे द्योतक प्रगतीचा
                    चक्र निळे संस्कृतीचे दिव्यप्रेरक हो
                 नेत्री रूप तुझे, तव नाम धरून ओठी
                 कित्येकांनी दिधले प्राण तुझ्यासाठी
                 मान तुझा उंचावे जगताच्या हाटी
                     राष्ट्रध्वजसंधी तू सुयशे नेता हो
                 शांतीची, सौख्याची वृद्धी कर आता
                 मानवतेचे  लाभो यश वैभव हाता
                 विश्वाच्या शांतीचा हो तूच प्रणेता
                     रांम दिसावा राष्ट्री..त्यां तू साधन हो ..  
              जय जय श्रीनवहिंदध्वजदेवा जय हो
वडिलांनी लिहिलेल्या ह्या गीताचे संगीतकार आहेत आमचे माणगावकर मास्तर, म्हणजे आमच्या शाळेचे म्हणजेच पर्यायानं अख्ख्या गावाचे गायन-शिक्षक. माझ्या गाणारी वाट ह्या पुस्तकात  आरंभी अगदी बालपणीच माझ्या अस्तित्वात संगीताचा अमृतकण प्रथम पेरला गेला तो प्रसंग जरा मजेदार शैलीत लिहिला आहे.  त्यांत कुठलेच नांव गांव इत्यादी तपशील दिलेले नाहीत.. पण त्यातले ते किर्लोस्करी लोखंडी खुर्चीवर अवघडून बसलेले, धोतर-कोट-टोपी ह्या पेह्ररावातले, बाभळीच्या खोडासारखी मुद्रा असलेले गृहस्थ म्हणजेच हे आमचे लाडके, माणगावकर मास्तर.  त्यांची हार्मोनियमवरची नाचणारी फुलपाखरांसारखी चपळ बोटं पाहूनच तर मी घरातल्या वडलांच्या पेटीवर कुणाला नकळत हात टाकू लागलो.  हया मास्तरांचं  मोठेपण तसं आम्हाला खूपच उशीरा नीट समजलं. (पण तशी ती एकूण प्रथा किंवा परंपराच आहे, जगांत कुठेही)..  पण तरी त्यांचं आमच्या त्या छोट्या विश्वापुरतं एक गलेमर  आम्हाला नक्कीच होतं.  संगीतकार, संगीत-दिग्दर्शन ह्या गोष्टींची जाणीवही नव्हती तेव्हापासून त्यांच्या अनोख्या चाली असलेली दोन गाणी आमची खूप आवडती होती..  एक म्हणजे, श्रीपाद कृष्णांचं सुप्रसिद्ध प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा .. त्या गाण्याची मूळची जी  आजही गायली जाते ती सुप्रसिद्ध चाल तेव्हाही आम्हाला आजच्या इतकीच आवडती होती..पण तसं असूनही त्याच गाण्याला माणगावकर मास्तरांनी लावलेली वेगळी मधुर चाल ही जणू आमची मर्मबंधातली  ठेव होती.  आणि तशीच ही दुसरी चाल.. तिरंगी ध्वजाची आरती... 

जसजसा मोठा होत गेलो तशी ती स्वररचना मला अधिकच  आवडू लागली.. इतकंच नव्हे तर निरंतर कुतूहलाचा विषय बनली.  आजही जुनी वाटू नये अशी ताजगी त्या स्वरांना लगडली आहे.  स्वत: गीत-संगीत-विश्वांत विहार करू लागलो, तशा गीत-निर्मिती-प्रक्रियेतल्या खुब्या कळू लागल्या... आणि म्हणून ह्या गाण्यापुरता माझा मीच एक अंदाज पक्का केला आणि  वडीलाना तो केवळ कन्फर्म करावा म्हणून विचारलं..  ही चाल आधी बांधून मग तुम्ही हे शब्द लिहिले असतील ना ? वडिलांनी मला धक्काच दिला ..ते म्हणाले, छे रे.. मी फक्त  ध्वज हा विषय पकडून नुसती पारंपारिक आरती लिहिलीय रे.. म्हणून पहा ना .. मी उडालोच. खरोखरच  सुखकर्ता दुखकर्ता ह्या चालीत हे सम्पूर्ण गाण् फिट्ट बसतं.  आणि मग मला माणगावकर मास्तरांचं मोठेपण जणू नव्यानं उमगलं. त्यांनी त्या पारंपारिक आरतीचा आकृतीबंध आपल्या अनोख्या स्वराकृतीनं जणू ताजा टवटवीत करून टाकलाय.  अभिजात गीत लिहिणारा गीतकार मोठाच.. पण रचनेतली सुप्त लय पकडून, तर कधी कधी मूळची लय पूर्ण बदलूनही संगीतकार काय किमया करतो ह्यांचा तो मला मिळालेला पहिला धडाच म्हणता येईल...
मूळची कविता तुम्हाला ह्या लेखातच वाचायला मिळाली आहे. पण ती प्रत्ययकारी चाल ? तिचा साक्षात प्रत्यय तुम्हाला कसा बरे मिळणार..? आहे, तीही सोय आहे.  ह्याच लेखात मी, आधी बीज एकले ह्या बोधचित्रपटाचा उल्लेख केला आहे. त्याचा सगळा शिखरबिदू (आपल्या मराठीत, क्लायमेंक्स)  समूहस्वरात ध्वनिमुद्रित केलेल्या ह्या चैतन्यदायी शब्द-स्वरांच्या पार्श्वभूमीवरतीच  बांधला आहे.  तो अनुभवून पहाच.  आता ती डीव्हीडी कुठे मिळणार ?
सगळी उत्तरं बसल्याजागी कशी बरे मिळणार.. शोधा म्हणजे सापडेल.  कमीत कमी माझ्यापर्यंत पोचलात तरी काम होऊन जाईल.
              मग, कधी निघताय ?

Sunday 11 September 2011

स्वगत संवाद - १०

मागच्या आठवड्यात अचानकपणे उगारला जाउन आलो.  आमच्या लहानपणी सहलीला जाण्याची जी काही पेटंट ठिकाणं होती त्यामध्ये उगार ह्या कर्नाटकातील गावाचा नंबर बराच वर लागतो. उगारचा साखरेचा कारखाना पहाणे आणि तिथूनच पुढे गोकाकचा धबधबा आणि मुख्य म्हणजे तिथला झुलता पूल पहाणे आणि मग परत आल्यावर माझी गोकाकची सहल हा निबंध लिहिणे ही सक्तीची  शिक्षा भोगणे ह्याला काही पर्याय नव्हता.  आमचा गांव किर्लोस्करवाडी आणि हे उगार शुगर वर्क्स ह्यांच्यात काही एक वेगळीच जवळीक होती.  कारखाना, सोशल क्लब, महिला मंडळ, शाळा ह्या सर्व पातळ्यावर ही देवाणघेवाण अखंड चालायची ..  पण त्यातील सर्वात मोठा दुवा म्हणजे उगार आणि किर्लोस्करवाडी ह्यामधली क्रिकेट मेच . ह्या क्रिकेट संदर्भात बहुधा प्रफुल्ल शिरगांवकर हे नांव लहानपणापासून खूप जवळचं झालं होतं.. पण त्यांची खरी प्रत्यक्ष भेट आणि ओळख गेल्या वर्षी किर्लोस्करवाडीच्या शतक महोत्सवाच्या वेळी झाली,ती आमचा दोघांचा समान दोस्त विजय जांभेकर ह्याच्यामुळे आणि त्या नव्या ओळखीला  खरा उजाळा मिळाला ह्या नुकत्याच झालेल्या उगार-भेटीमुळे.  अगदी अकल्पितपणे प्रफुल्लजीन्चा फोन आला.  उगार शुगर वर्क्सच्या जिमखाना डे ला चीफ गेस्ट म्हणून येणार का ?  माझ्याही नकळत मी हो कधी म्हटलं ते मलाही कळलं नाही. हा बहुधा ह्या जुन्या ऋणानुबंधाचा परिणाम असणार.. पण एक खरं की ही पुनर्भेट खूप सुखाची आणि आनंदाची ठरली.

एकतर तो सम्पूर्ण  दिवसभर जिमखान्याच्या मोठ्या मैदानावर विविध खेळ पहाताना आणि काही वेळा चीफ गेस्ट म्हणून थोडा सहभागही देताना (होय बरे होय) मी पुन्हा लहान होऊन वाडीच्या दिवसात गेलो होतो.. एरवी ह्या प्रकारे भूतकाळात जायला आणि त्यासाठी पुन्हा एकदा लहान वगैरे व्हायला मला फारसं आवडत नाही.. कारण खरोखर लहान होतो तेव्हांही  मला केव्हा एकदा मोठे होतोय अशीच घाई झाली होती. पण तो दिवस मात्र अपवाद ठरला.. कारण आपल्या गुलझारसाहेबांची आठवण काढत क्षणाक्षणाला मी फ्लेशबेकमधे जात होतो.

मैदानावरचे खेळ संपल्यावर जिमखाना हॉलमध्ये प्रामुख्याने अधिकारी पुरुषवर्गासाठी काही मजेदार इन-डोअर सांघिक खेळ होते. (प्रमुख पाहुण्यांचा सहभागही ओघानं आलाच.)  त्यामध्ये एक वेगळा,  स्त्रियांच्या संगीत खुर्चीसारखा खेळ होता. निदान मला तरी तो अनोळखी होता.   उपस्थित पुरुषांची समान संख्या असलेया ५/६ टीम मध्ये विभागणी केली होती.  ते गट मध्यभागी ठेवून चारही बाजूला चार एअरपोर्टचे फलक उभे केले होती.  बेळगाव, बेंगलोर, कोल्हापूर आणि गोवा .. माग संगीत सुरू झालं की सर्व गट एकामागोमाग लाईन धरून ते वर्तुळ फिरू लागत. म्युझिक थांबलं की ज्याला जो हवा असेल त्या फलकापाशी थांबायचं ..  त्यातील एक फलक रद्द केला जायचा की एक गटच्या गट बाद. ..की पुन्हा संगीत सुरू आणि पुढची फेरीही सुरू.  एकूण संख्येच्या प्रमाणात एकेक फलकही रद्द होत होता..शेवटी दोन फलक आणि दोनच व्यक्ती उरल्या आणि फायनल निकाल लागून  खेळ संपला..  मजा आली.  ही सर्व संकलपना आणि कार्यवाही सौभाग्यवती शिरगांवकर  आणि त्यांच्या स्त्री सहकारी ह्यांनी संचलित केली.  एकूण दिवस धामधुमीत आनंददायी गेला.  तो दिवसभर उगार आणि किर्लोस्करवाडीमधले अनेक समान धागे मला जाणवत होते. पण त्यातला एक धागा अगदीच अनपेक्षित होता. 

सकाळी खेळ सुरू होण्यापूर्वी आधी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पण तो ध्वज तो आपला नेहमीचा तिरंगा नव्हता..  तो खास वेगळा स्पोर्ट-फ्लेग म्हणजे क्रीडा-ध्वज होता.  सामूहिक ध्वजवंदन चालू असतांना मागे एक ध्वज-गीत गाईलं  गेलं. ते गीत रचणारे, स्वरबद्ध करणारे आणि गाणारे गृहस्थ स्थानिक कीर्तनकार होते.  ते साधुसुधे  शब्द आणि स्वर ऐकताना पुन्हा मी नकळत वाडीमध्ये गेलो. 

१५ ओगस्ट १९४७ ला किर्लोस्करवाडीमध्ये जो पहिला स्वातंत्र्यदिन-सोहळा थाटामाटात साजरा झाला त्याचाही शुभारंभ अशाच एका अनोख्या ध्वजगीताने झाला होता.    आजही ते ध्वजगीत  प्रत्येक वर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला वाडीमध्ये गाण्याची प्रथा किर्लोस्करवाडीमध्ये गेली  ६०/६५ वर्षे चालू आहे आणि पुढेही चालूच रहाणार आहे. 

योगायोग असा की त्याचे कवी रांम गणेश मोघे हे एरवी वाडीच्या कारखांन्यामधील नोकरदार पण व्यक्तिधर्माने आपादमस्तक कीर्तनकार (आणि शिवाय आमचे वडीलही)  आणि त्यांच्या सुंदर काव्याला अत्यंत वेधक आणि चैतन्यदायी स्वर देणारे आमचे तेव्हाचे गायन शिक्षक श्री. मांणगांवकर ह्या दोघांची ही निर्मिती होती.  त्याना भाग्यवान म्हणायला हवं ..कारण आपली कलाकृती आपल्या मागेही अखंड गाजत आणि वाजत राहण्याचं असं दुर्लभ भाग्य किती जणांच्या वाट्याला येतं ? लय ह्या कविता संग्रहात्ली  माझ्याच एका छोट्याशा कवितेतल्या दोन ओळी आठवतायत ..

               अर्धाच सोडुनी खेळ जायचे अंती
.               ध्वज नाचत राहील
               कुणाकुणाच्या हाती

गोष्ट खरीच आहे. त्या गीताचे दोन्ही निर्माते कधीच काळाआड गेले. पण पण १९४७ ते २०११ मधल्या शालेय मुलामुलीच्या  किती पिढ्या हे गीत गात राहिल्या आणि पुढच्याही गात रहाणार आहेत..तर अशा त्या भाग्यवान गीताची चाल कशी होती ? ती इथं लिहून कशी दाखवणार म्हणा.. पण मग निदान त्या काव्याचे शब्द काय होते ? आणि एकूणच त्या कलाकृतीची निर्मिती कथा ? 

             सांगू यां ..तीही सांगूया
                     पुन्हा केव्हातरी ..
                              लौकरच
                 कदाचित उद्या- परवासुद्धा ...

Saturday 3 September 2011

स्वगत संवाद - ९

हा स्वगत संवाद नामक ब्लॉग लिहू लागलो ह्यामुळे एकूणच छान वाटतं आहे.  मुख्य म्हणजे लगेच  वाचकांच्या प्रतिक्रियाही  येउ लागल्या. त्यातील आजच आलेल्या एका अभिप्रायानं आजचं हे लेखन करायला मला प्रवृत्त केलं आहे.  आजचा माझा स्वगत संवाद हा माझ्या ह्या स्वगत संवाद लिहिण्याविषयीच आहे.  तेव्हां मित्र प्रदीप वैद्याना त्यांच्या  मर्मग्राही  प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद देउ इच्छितो.  त्यांची प्रतिक्रिया इथं सांगण्यापूर्वी मी मुळात हे ब्लॉग लेखन करण्याकडे कां आणि कसा वळलोय  ते आधी सांगतो.

गेली काही वर्षं माझा हळूहळू गद्य लेखनाकडे ओढा वाढत चालला आहे. निरंकुशाची रोजनिशी, गाणारी वाट, स्वच्छंद, गाण्यांचे चांदणे अशी काही वृत्तपत्रातील सदरं मी लिहिली. त्यांना सुरेख प्रतिसाद मिळाला.  मेनका मासिकात एक वर्षभर संकल्पनां आणि आविष्कार हे मी आजवर केलेल्या रंगमंचीय प्रयोगांची निर्मिती प्रक्रिया सविस्तर सांगणारं  लेखनही मी केलं.. .तर अनुबंध हे पुस्तक मी थेट समग्र पुस्तकस्वरूपातच  लिहिलं.  त्याच प्रकारचे आणखीही काही लेखन-संकल्प मनांत आहेत.  त्यातील काही  लेखन चालूही आहे.  आणि हे असं असूनही ब्लॉग ह्या एका वेगळ्या दिशेनं मला अगदी नकळत स्वत:कडे खेचून घेतलं आहे. 

लेखनाच्या निमित्ताने संगणक, मग इंटरनेटचं अथांग विश्व आणि मग ओघानंच ई मेल, वेब साईट, फेस बुक, ब्लॉग ह्यांची तोंडओळख, असा कुणाचाही होतो तसाच माझाही प्रवास झाला.  त्यातली ई मेल रोजच्या आयुष्यात सामावून गेली. ह्यापूर्वी पत्रव्यवहार ह्या प्रकाराची माझ्याकडून अक्षम्य आबाळ  झाली होती.  कळतं पण वळत नाही, असा तो प्रकार होता.  आधी पत्र लिहिणे, मग नंतरचे पाकीट-तिकीट-डिंक इत्यादी सोपस्कार करून आठवणीने टपाल पेटीत टाकणे,(ही टपाल पेटी कुणी कधी उघडतं कां ? ह्या छळवादी प्रश्नाची मुस्कटदाबी करून ) ..मग ते पत्र कधी ई ई ई ई ई तरी पोचेल अशी आशा करणे आणि मग साहजिकच उत्तराची वाट पहात राहणे  हा सगळा प्रकार एकूणात आपल्या उत्साहाची (उत्साहाने) वाट लावणारा आणि त्यामुळे एकूणच    असहय ... त्यापेक्षा हे काहीच न करणे आणि कळण्याचा  चाले कळण्याशी संवाद ह्या ओळीवर विसंबणे हे मला अधिक मांनवायचे. .. पण आता ह्या ई मेलनं किमयाच केली आहे.. दोन चार ओळीत मन मोकळं करायचं आणि एक क्लिक की एकदम क्षणांत साता समुद्रापार. बरं, सोबत तत्काळ पत्र गेल्याची (आणि पोचल्याचीही) पावती आणि कधी कधी तर उलट उत्तरही.. आणि हा सगळा लक्ष योजनांचा प्रवास ज्ञानदेवाच्या भाषेत,  आपुला ठावो न सांडीता (म्हणजे आपली जागा न सोडता).. पण ह्या ई मेल प्रकाराच्या तुलनेत बाकीच्या ह्या इतर प्रकारांच्या जवळ मी जरा आस्ते आस्ते जातो आहे.

ह्यापैकी माझी  वेबसाईट मी नुकतीच करायला टाकली आहे. (शिंप्याकडे प्यांट शिवायला टाकतात, तसं वाटतं ना हे ? पण वेब साईटसुद्धा शिवायची नसली तरी विणायची असतेच ना.. ) फेसबुक हा प्रकार मला तसा फारसा जवळचा नाही वाटला. माझा एक  मित्र त्याला चावडी (की चावडीसमोरचा पार ?) म्हणतो.  हा अर्थ गृहीत धरला तर पारावर बसून आल्या गेल्या गोंडस चेह-यांना ह्टकण्याचे दिवस मागे पडले आणि तेच चेहरे किलकिल्या डोळ्यांनी फुटक्या भिंगातून निरखण्याचे दिवस अजून दूर आहेत (आणि ते तसे दूरच असोत) ..पण तरीही ह्या  फेसबुक नामे चावडीवर माझी अप्रत्यक्ष  हजेरी डॉ. अमित करकरे ह्या तरूण मित्रामुळे लागतेच. पण ब्लॉग हया प्रकाराविषयी मात्र मला अनाकलनीय दूरस्थ आकर्षण कधीपासून वाटत आलं आहे. हा ब्लॉग म्हणजे नक्की काय आणि तो कशाशी (कशासाठी?) खातात ह्याचा कणभरही पत्ता मला नव्हता आणि खरं तर आजही नाही , तरीही.. आजमितीला  माझं त्याच्यापर्यंत येणं घडतंय ते माझ्या एका तर्क-विचार पद्धतीतून कुठलाही कलाकार केवळ स्वांत:सुखाय आपले आविष्कार करीत नसतो. रसिकांची दाद हेच त्याचं एक लक्ष्य आणि टोनिकही असतं.  त्याचेही दोन प्रकार.. एक म्हणजे, सजीव आविष्काराची थेट सामूहिक दाद.  तिची किक काही औरच.  तसा परफोर्मर अंगात पुरेपूर भिनलेला असल्यामुळे तीही दाद मी पोटभर अनुभवलीय आणि अनुभवतोय. पण दुसरी एक अप्रत्यक्ष दाद, जी प्रामुख्याने लेखनातून मिळते तिची  ओढ मला काकणभर अधिक आहे.   आपण एकांतात एकटेच आपलं मन शब्दात उकलत बसतो. समोर कुणीही नसतं.. मग ते दूर दूर कुणा रसिकाच्या हाती पडतं.  तोही एकट्यानेच एकांतात त्याचां आस्वाद घेतो आणि क्षणांत आपल्याशी जोडला जातो..  बहुतेक वेळी आपल्याला कळतही नाही .. पण कधीतरी  योगायोगाने तो आपल्या पर्यंत पोचतो आणि तेव्हांचा आपला आनंद केवळ अवर्णनीय असतो. .दैनिक साप्ताहिकातली सदरं, मासिक नियतकालिकातील लेखन, पुस्तकरूपानं होणारं प्रकटीकरण ह्या सगळ्या माध्यमांचा ह्यात समावेश आहेच. किंबहुना इतके दिवस तोच एक अधिकृत मार्ग लेखकांना होता.   पण तिथंही मध्ये गाळणी असतात, संपादक, प्रकाशक ..त्यांच्या आवडी-निवडी, त्यांच्या व्यावहारिक अडचणी, शब्दमर्यादा...नेहमी वाटायचं,  असं मध्यम पाहिजे की जिथे आपल्याला मनसोक्त व्यक्त होता यावं आणि ते मध्ये कुणीही न येतां थेट रसिकांनी स्वीकारावं किंवा नाकारावं.. दोघांचेही एकमेकांना दडपण नाही.  तुम्हाला लिहिण्याचं स्वातंत्र्य ..त्यांना वाचण्याचं किंवा न वाचण्याचं स्वातंत्र्य  दोघेही आपल्या मनाचे राजे.  हा धूसर विचार खूप दिवस, खरं तर वर्षं मनांत तरळत होता.  संगणक, इंटर नेट आणि ब्लॉग ह्यांनी तो साक्षात साकार केला आहे. 

परवा कुणीतरी म्हटलं की ज्याचं कुणीही प्रकाशित करत नाही.. त्यांची ही सोय आहे. असेलही..  पण तितकंच ते नवं अंगण आहे, अखंड उलगडत जाणा-यां क्षितिजापर्यंत तुम्हाला नेणारं ..ते उद्याचं एक नवं आकाशही असेल, जे  तुम्हाला वरची सात आकाशं खुली करेल... उत्तर पेशवाईत शाहीर प्रभाकर म्हणून गेलाय.  ज्या दिशेस ज्याचा रोख ती त्याला मुभा.. स्वगत संवादच्या दुस-यां लाटेत मी काय लिहिलं होतं, आठवतंय ना ? कवी स्वप्न पहातात आणि वैज्ञानिक ते साकार करतात.  तेव्हां हे लेखन म्हणजे विसाव्या शतकात जन्मलेल्या-वाढलेल्या  कवीची एकविसाव्या शतकाला  दिलेली ही दाद मानायला कुणाची हरकत असणार ?

पण आजचं लेखन इथं संपत नाही.  ज्यामुळ हे लिहिणं प्रेरित झालं ती प्रदीप वैद्यांची प्रतिक्रिया माझ्या मानसिकतेच्या जणू मर्मावरच भेट ठेवणारी म्हणावी लागेल.  झालं काय ..मी आंतरिक प्रेरणेनं ब्लॉग लिहू लागलो खरा..पण मनावर दडपण होतं.. किंवा आहेसुद्धा..  हा नवा लेखन प्रकार, खरंतर नवीन  लेखनप्रयोग हाताळताना काय लिहावं, कसं लिहावं किती लिहावं ? ..म्हणजे सदर लेखनात मी संपादक प्रकाशकांकडून पडणा-या शब्द-मर्यादेविषयी बोललो. ते दडपण मीही घेतोच आहे. ते  केवळ दडपणही नाहीये. गोष्टीवेल्हाळपणाची खुमारी मला नुसती ठाउकच  नाही, तर छान अवगतही आहे.  पण म्हणून पाल्हाळ लावून चालणार नाही.  आणि खोल मनांत नेमकेपणा आणि अल्पाक्षरी आविक्ष्काराची ओढ आहे. पण म्हणून लेखन त्रोटकही होता कामा नये.. ह्या द्विधा अवस्थित माझी अंमळ कोंडीच होत होती.

प्रदीपनी नेमकं त्यावरच बोट ठेवलं.  त्यांनी नेमकं काय म्हटलं  आणि मला ते कसं किती कळलं ह्याची प्रचीती संवेदनशीलजाणकार वाचकांना हया लेखातूनच येईल ही खात्री आहे.  पण माझ्या अनाहून अद्न्यात वाचकांनाही हे सगळं वाचून काय वाटतंय  तेही जाणुन घ्यायला मला आवडेल..

                आणि म्हणून आजचा हा स्वगत संवाद ,
                     खुद्द स्वगत संवादाविषयीच..