Tuesday 30 August 2011

स्वगत संवाद - ७

गेले काही वर्षापासून मराठी वाद्यवृन्द नामे क्षेत्रातील निवेदक ह्या जमातीत आपल्या बोलण्यात कविता वापरण्याची एक (स्वत:च स्वत:वर लादलेली) सक्ती आढळून  येते.  त्यांना दोष देण्यात अर्थ नाही.. कारण तब्बल चाळीस वर्षापूर्वी आमच्या स्वरानंद संस्थेनं आपली आवड हा पहिलावहिला मराठी वाद्यवृंद सुरू केला.. त्यामध्ये पहिला निवेदक (आजच्या भाषेत, सूत्र-संचालक) ह्या नात्याने मीच ही प्रथा सुरू करायला नकळत कारणीभूत झालो....  तो इतिहास मजेदार आहे..  निमित्ता-निमित्ताने आजवर सांगितला गेलेला आहे.. पण केवळ संदर्भ म्हणून इथे अगदी थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो...कारण मुख्य सांगायची आहे ती कविता निवेदनात समाविष्ट करण्यामागची विचार-प्रक्रिया.

साल १९७०.. नुकताच पुणेकर झालेला मी ह्या नव्या जगांत स्वत:ची एक जागा निर्माण करण्याच्या शोधात होतो... समोर दिसणारी दारं निमंत्रण देत होती. पण  काही ना काही कारणांनी मी त्यांना सन्मुख होत नव्हतो.. काहीवेळा तीही मला हूल देउन मिटत होती. अशा दोलायमन मन:स्थितीत मी लक्ष्मी क्रीडा मंदिरात झालेल्या आपली आवड ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या प्रयोगाला केवळ श्रोता म्हणून उपस्थित राहिलो.  ते दिवस हिंदी ऑर्केस्ट्राच्या भरभराटीचे होते.. त्या झगमगत्या पार्श्वभूमीवर उभा राहिलेला हा महाराष्ट्रातील पहिला मराठी वाद्यवृंद त्याच्या वेगळेपणामुळे आणि साधेपणामुळे मला खूप भावाला.  आणि मलाही कळण्याआधी मी त्यांत दाखल झालो.. निवेदक म्हणून.  ही भूमिका मला अगदी अनपेक्षित होती.

माझ्याआधी सुहास तांबे ते काम करीत होता.  सुहास देखणा होता, बुद्धिमान होता.. बहुश्रुत होता... उमेदीचा लेखक होता. 'डियर पिनाक', 'ती येते' ह्यासारख्या त्याच्या गाजलेल्या एकांकिका अजून क्षितिजाआड होत्या. पण ती चमक त्याच्या लिहिण्या बोलण्यात नक्कीच होती.  पण तरीही तो ह्या निवेदक भूमिकेत कम्फर्टेबल नाही असं दिसत होतं.  त्यालाही ते जाणवत होतं. एकदा प्रयोगानंतर त्यानं मला, माझं काय गडबडतंय म्हणून विचारलंही. मला तरी काय कुठे कळत होतं ?.. मी त्याला त्याच्या रंगमंचावरील हालचालीविषयी काही सुचवून पाहिलं ..पण त्याहून अधिक महत्वाची अशी एक गोष्ट मी नकळत मांडली होती.  तू प्रत्येक भावगीताआधी जे थोडं भावूक पण कृतक काव्यात्मक बोलतोस.. त्याहून काहीतरी थेट, ठोस पण तरीही ह्रदयाला भिडणार बोलायला हवं..  असं बोललो खरा, पण म्हणजे नेमकं काय हे मला तरी कुठे ठाउक होतं ? म्हणून ते आव्हान माझ्यावरच गुदरल्यावर मीही काही काळ गोंधळून गेलो.  पण हळू हळू धुकं निवळलं.

तेव्हां माझी रेडियो श्रवणभक्ती  ऐन जोसात होती. प्रामुख्याने रेडियो सिलोन, विविध भारती, रेडियो पाकिस्तान हे त्यांत होतेच. पण रोज दुपारी रेडियो दिल्ली केंद्रावरचा एक कार्यक्रम मी नियमित ऐकायचो. त्यांत आवडती हिंदी गाणी असायची. पण त्याहीपेक्षा माझं आकर्षण होतं ते दोन गाण्यांमधलं निवेदन.. ताजे तरूण स्त्री आणि पुरुष-स्वर चमकदार शेरोशायरीतून ती गाणी ओवीत जायचे. ते शेर पुढच्या गीतांच्या आशयाला कधी समांतर तर कधी वेगळाच अंदाज व्यक्त करणारे असायचे.. पण त्यातूनच पुढचं गीत हलकेच उमलून येतं आहे असं ऐकताना भासायचं.. मी हाच प्रकार माझ्या निवेदनात वापरायचा ठरवला. सुदैवानं विश्वानाथ ओकही ते कार्यक्रम ऐकत होता.. त्यामुळी त्यालाही माझी कल्पना पसंत पडली. पण तरीही आम्हा दोघानाही प्रत्यक्ष रंगमंचावर हा प्रयोग किती हिट ठरणार आहे, ह्यांचा अंदाज नव्हता.. १९७१ च्या नोव्हे-डिसेबरमध्ये माझ्या ताज्या टवटवीत  कविता घेउन रंगमंचावर उभा राहिलो. आणि त्या क्षणार्धात एका दीर्घकालीन लोकप्रियतेच्या लाटेवर आम्ही सगळे डौलात तरंगू लागलो.. स्वरानंद संस्था, आपली आवडच आमचा कलाकार चमू आणि अर्थात कवी=निवेदक म्हणून स्वत:, सुधीर मोघेही.

Monday 29 August 2011

स्वगत संवाद - ६

गेले काही दिवस स्पेस (space) हा शब्द किंवा खरं तर ही संकल्पना माझ्या मनाचा ठाव घेउ लागली आहे. त्या शब्दाला मराठी प्रतिशब्द अवकाश असा आहे.

पण इंग्रजी-मराठी असा भेद  तरी का करायचा? कारण एव्हांना जे इंग्रजी शब्द मराठी भाषेत पूर्ण रुळले आहेत त्यातलाच हाही एक शब्द, स्पेस.  आजकाल व्यक्तिजीवनांत जे संघर्ष नव्यानं उभे राहताहेत आणि आपल्या पारंपारिक कुटुंब जीवनाच्या कल्पना झपाट्यानं ढासळू लागल्या आहेत, त्यांच्या मुळाशीसुद्धा हाच शब्द आहे.. आज प्रत्येकाला  आपली अशी स्पेस हवी आहे.  आणि तत्वत: विचार केला तर त्यांत काहीही वावगं नाही.

मी आज हे लिहू लागलो आहे, त्यामागेही अशीच काहीतरी खळबळ आहे.  पण त्या व्यक्तिगत गोष्टी बाजूला ठेवून ह्या स्पेस शब्दाची स्पेस जरा तपासून पहावी आणि एन्जॉयही करावी असं मनांत येतंय. पण म्हणजे आपल्याला आता स्पेस किंवा अवकाश ह्या दोन्ही शब्दात जरा खोल उतरायला हवं. आणि हा विचार मनांत आला की लगेच मातोश्री बहिणाबाईची ओळ आठवते...
मन एव्हढं एव्हढं
जसा खसखसचा दाणा
मन केव्ह्ढ केव्हढ
त्यांत आभाळ माईना..

म्हणजे जरा सूक्ष्मदर्शक कोन लावला तर दोन जिवलगांमधील श्वासांतर आणि मनांतरही..आणि तोच कोन  वाढवत नेला तर आपल्याभोवती पसरलेल्या विराट विश्वांचा कधी न संपणारा अमर्याद अज्ञात-वेधही .. अवकाश ह्या शब्दाची जाणीव मला जाणीवपूर्वक प्रथम झाली ह्याचं श्रेय विख्यात वास्तूरचनाकार आणि ललित लेखक माधव आचवल ह्यांना द्यायला हवं...  त्यांच्या एका दिसताना अत्यंत साध्यासुध्या भासणा-यां वाक्यानं रोजच्या आयुष्यातली एक नवी जागृती मला दिली .. दोन तळहात एकमेकांसमोर धरले की अवकाशाची मांडणी सुरू होते..  वास्तुरचनेसंदर्भात लिहिलेलं हे वाक्य उभ्या जीवनाचं  आणि जगातील सर्व कलाविष्काराचं मूलभूत सूत्र मानावं लागेल. 

प्रख्यात नर्तिका,गुरू आणि तत्वंचिंतक रोहिणी भाटे नृत्य-आविष्कार म्हणजे पुन्हा एकदा अवकाशाची पुंनर्माडणी असंच म्हणायच्या ..चित्रकारासमोरचा कोरा चित्रसोपान म्हणजेही एकाअर्थी त्याचा अवकाशच.  गायन-वादनातली स्वरांतरं आणि लय तत्वातील कणांतरं म्हणजेही एकाअर्थी अवकाशाची पुनर्रचनाच .नाट्य-चित्रपटात प्रतिभाशाली दिग्दर्शक आपल्या निष्णात तंत्रकुशल टीमच्या सहकार्यानं एकाअर्थी हा अवकाशवेधच  घेत  असतो.  कसलेला अभिनेता रंगमंचाच्या अवकाशात देहबोली आणि वाणी ह्या दोन आयुधांनी अवकाशतत्वाशीच क्रीडा करीत असतो.. आणि जगातले  सगळे क्रीडाप्रकार आपली नजरबंदी करतात तो हा अवकाशाचा खेळ खेळतच...हे सगळं नीट उमगलं की आपले रोजचे व्यवहारही भोवतीच्या अवकाशाशी संवाद साधत आपण पार पडत असतो हे उमगेल..  आणि सा-यां जगण्यालाच एक वेगळी ताजगी लाभेल .

हां, मात्र त्यासाठी स्वत:लाच जरा अवकाश द्यायला हवा
आणि आपला अवकाश डोळसपणे ओळखायलाही हवा.

Sunday 28 August 2011

स्वगत संवाद - ५

स्वत: कवी व्हायला मी ब-यापैकी उशीर केला असला तरी कवितेवरचं माझं प्रेम मात्र अगदी बालपणापासूनचं.  शीघ्र-स्मरणाचा वारसा घरातूनच मिळाला होता. त्यामुळं कितीतरी जुन्या नव्या कविता, आणि कवी मला  तोंडपाठ होते.. डोक्यातही एकीकडे कवितेचं गुंजन अखंड चालू असायचं ..कविता वाचायला आवडायची तशीच ऐकायलाही आवडायची .त्यामुळं कवीच्या काव्यवाचनाचा किंवा काव्य-गायनाचा (त्याकाळी ह्याचं प्राबल्य जरा अधिक होतं) आस्वाद घेण्याची कुठलीही संधी मी चुकवीत नव्हतो. त्याचा आनंद मिळत होताच. पण तो शंभर टक्के निर्भेळ नसायचा. अर्थात ह्यालाही एक कारण होतं.
 
कवितेइतकीच रंगभूमी आणि संगीत ही क्षेत्रं प्रथमपासून आवडीची होती. त्यात सुदैवानं चांगली गतीही होती. त्यामुळं आस्वाद आणि सादरीकरण ह्या दोन्ही अंगांनी त्यांचाही आनंद खूप लुटत होतो. त्यातून साहजिकच अभिजात  performance हया गोष्टीची जाणीव आणि त्यातले निकष ह्यांचीही मनांत एक बैठक तयार होत गेली..

ह्या पार्श्वभूमीवर, काही सन्मान्य अपवाद वगळता, मला बहुतेक कवींच्या सादरीकरणात उणेपण जाणवायचं .. कधी त्यांच्यात अभिजात परफॉर्मन्सचा अभाव असायचा तर बहुतेक कवींच्या काव्य-गायनात संगीताच्या अंगानं असलेलं उणेपण खटकत रहायचं. ह्याउलट काही चांगले अभिनयकुशल कलाकार आणि गायक अनेक कवींच्या कविता फार सुंदर सादर करायचे. पण तो आनंद लुटताना, त्या सादरीकरणात स्वत: कवी धूसर राहून हे कलाकारच ठसठशीतपणे समोर येताहेत ही वस्तुस्थिती अस्वस्थ करायची.

थोडक्यात, चांगला सादरकर्ता, चांगला गायक आणि चांगला कवी ह्याचा साक्षात्कार एकाच व्यक्तिमत्वातून घडावा अशी एक वेगळीच तहान मनाला व्यापत चालली होती  पण पुढे आधी रंगभूमी, नंतर भाव-गायन आणि नंतर सर्वार्थानं शंभर टक्के कवी अशी स्वत:चीच वाटचाल झाल्यावर, ती माझी तहान आपल्या परीनं आपण तृप्त करू शकतो कां ह्याकॅं शोध घेणे ही गोष्ट जणू ओघानं आपसूकच उलगडत गेली ..

१९७१ मध्ये आपली आवड मध्ये सूत्र-निवेदन म्हणून कविता सादर करणं, १९७५ मध्ये कविता कविता कविता आणि १९८७ मध्ये कविता पानोपानी हे काव्य-प्रयोग साकार करणं आणि दीर्घकाळ चालवणं  हा सगळा प्रवास ही आजवरच्या  आत्म-चिंतनाची  आणि आत्म-प्रकटीकरणाची परिणती ठरते..  आणि   त्यातूनच आला आजचा हा, अभिजात शास्त्रीय गायनाच्या उपज-अंगानं जाउ पहाणारा माझा नवा लवचिक काव्य-प्रयोग,, .. कविता-सखी  

तेव्हां हा नवा प्रयोग उभा करायला किती अवधी लागला ह्या प्रश्नाचं ताबडतोब येणारं एक उत्तर, केवळ आठ पंधरा दिवस असं असलं तरी त्याचं दुसरं खरं उत्तर आजवर कलाकार आणि माणूस म्हणून जगलेलं समग्र आयुष्य हे आणि हेच असेल.

Friday 19 August 2011

स्वगत संवाद - ४

१९७० चं दशक माझ्या आयुष्यात फार महत्वाचं आहे. कारण तेव्हां पहिलं अत्यंत महत्वाचं स्थलांतर मी केलं.. जन्मगाव कायमचं सोडून पुणे मुंबईच्या विशाल विश्वांत आलो. त्यातून खूप छोटी मोठी परिवर्तनं झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे पुण्यात आल्यावरच माझ्यातील कवी प्रकर्षानं प्रकट होत चालला.  ह्याआधीच्या जगण्याला व्यापून असलेलं नाटकवेड कसं कुणास ठाउक, ओसरत गेलं.  गाणं सोबतीला राहिलं. पण त्यातही गायकापेक्षा आंत लपलेला संगीतकार अधिक कार्यरत होऊ लागला.  पण ह्या सर्वाना वरचढ ठरला तो माझ्यातील इतके दिवस चुपचाप बसलेला कवी आणि गीतकार.  पुढे मग त्यालाही किती किती शाखा फुटत राहिल्या.  कला क्षेत्रातील विविध भूमिकां आणि विविध माध्यमं खुणावत राहिली आणि मीही त्यांच्या हाकांना प्रतिसाद देत राहिलो. पण त्या सर्वावर वर्चस्व राहिलं ते माझ्यातील कवीचं.

कवी झालो म्हटल्यावर रसिकांना आपली कविता थेट ऐकवण्याची तहान तल्लख होत चालली.  परंतू  एकीकडे कवी सम्मेलन ह्या लोकप्रिय प्रकाराची मात्र  का कोण जाणे, बालपणापासून बहुधा जणू अंगभूत म्हणावी अशी एलर्जीच मला  होती..  तिचं कसलंही समर्थन किंवा त्याविषयी बढाई हे लिहिताना मनात खरोखरच नाही ..पण कवि सम्मेलन नामक ओघानं येणारं व्यासपीठ मनाला ओढ लावत  नव्हतं, हे मात्र खरं ..मग साहजिकच  नाटकाच्या निमित्तानं आजवर ज्यावर बागडलो होतो तो रंग-मंच मी जवळ केला ..किंबहुना एकाअर्थी त्यानंच मला जवळ घेतलं आणि मला आपले शब्द-स्वरांचे प्रयोग करायला मनाजोगतं अंगण दिलं. अगदी ह्या आजच्या कवितासखी पर्यंत... पण ह्या कविता-सखीबद्दल काही बोलण्याआधी तिच्या  उभारणीमागे पायाभूत असलेल्या तीन वळणाचा धांवता कां होईना पण मागोवा घ्यायला हवा.

तसं पहायला गेलं तर संकल्पना-संहिता आणि दिग्दर्शन ह्या नात्यानं मी मागच्या तीन दशकात  रंगभूमीवर आणलेल्या शब्द स्वरांच्या प्रयोगांची एक मालिकाच उलगडेल. १९७१ मध्ये आपली आवड ह्या महाराष्ट्रातील पहिल्या भावगीत वृंदाचा पहिला सूत्रनिवेदक, १९७२ मध्ये स्वतंत्रते भगवती, १९७५ मध्ये मंतरलेल्या चैत्रबनात आणि कविता कविता कविता, १९७७ मध्ये आणिले टिपूनी अमृतकण, १९८१ मध्ये चिन्मय मिशनच्या पुणे शाखेनं साकार केलेला समर्थ रामदासांचा जीवनआलेख मांडणारा घ्वनि-प्रकाश समूह आविष्कार आनंदवन भुवनी, १९८४ मध्ये रॉय किणीकरांच्या अनवट कलंदर कवितेचा प्रत्यय देणारा उत्तररात्र, १९८९ मध्ये पहिल्या जागतिक मराठी परिषदेत साकार होऊन जगभर पोचलेला स्मरणयात्रा, २००३ मध्ये झी मराठी वाहिनीवर गाजलेली मालिका नक्षत्रांचे देणे ह्यातले शांता शेळके, कुसुमाग्रज आणि सुधीर फडके हे तीन प्रयोग,  २००५ जानेवारीत ई टीव्ही साठी गदिमांच्या जन्मभूमीत २५ हजार रसिकांपुढे झालेला  माडगुळ्याचे गदिमा आणि १९८७ ते थेट आजमितीप्रयन्त २४ वर्षे अव्याहत चाललेला माझा एकट्याचा एकल आविष्कार, कविता पानोपानी..

पण ह्या मालिकेतील केवळ तीन वळण आजच्या कवितासखी ह्या ताज्या प्रयोगाशी जोडलेली आहेत.. कारण कवितासखीप्रमाणेच ते तीनही प्रयोगदेखील,  स्वत: कवीनं स्वत:च्या काविताचं घडवलेलं निखळ काव्यदर्शन होतं..  तात्पर्य,  आपली आवड, कविता कविता कविता, कविता पानोपानी आणि कविता-सखी हे चार प्रयोग हा कवी आणि परफोर्मर म्हणून माझी झालेली घडण आणि त्या त्या वेळची माझी मानसिकता ह्यांचा एक धावता मागोवाच ठरेल  अगदी थोडक्यात त्याचा परामर्श घ्यावा असा आजचा मनोदय आहे....

Thursday 18 August 2011

स्वगत संवाद - ३

परवाच्या ३१ जुलै २०११ च्या रविवारी माझी नवी काव्यमैफिल कविता-सखी मी प्रकाशात आणली. सर्वच योग चांगले, म्हणजे माझ्या मनासारखे जुळून आले होते. तसे ते बहुतेकवेळी जुळतातच. कारण तसे ते जुळून येईपर्यंत कितीही वाट पहाण्याची माझी तयारी असते.. ह्यामध्ये केवळ ती एक न संपणारी प्रतीक्षा ठरण्याचा धोका नक्कीच असतो. पण तो मला परवडतो  घाईघाईनं  काहीतरी झालं एकदाचं हया प्रकारच्या समाधानापेक्षा ती गोष्ट अजिबात न होणं हे सुद्द्धा एकवेळ मला परवडतं..  इतकी टोकाची भूमिका असल्यामुळे असेल कदाचित पण तशी चुकामूक आजवरच्या आयुष्यात  जवळ जवळ मी अनुभवली नाहीच, असं म्हणता येईल.  अर्थात आजवर ती अनुभवली नाही म्हणून भविष्यात ती नसेलच असं मुळीच नाही.  पण तरीही त्या धास्तीनं माझा मूळचा मनोधर्म बदलेल अशी शक्यता दिसत नाही.. उलट तो मनोधर्म अधिक बळकट व्हावा असेच अनुभव मला पुन्हा पुन्हा येत राहतात.. उदा. हा काव्यप्रयोग, कविता सखी..

पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तो प्रयोग करण्यासाठी मिळालेली भूमी.. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या दीनायन कलापर्व हया उपक्रमात हा प्रयोग थाटामाटात साजरा झाला.  स्थळ होतं, हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील सौद वाहवान नामे सभागृह.  तिथं खरं तर बरेच वेळा जाणं झालं. पण त्याचं नांव हे असं काही तरी आहे हा शोध मला हया निमित्ताने प्रथमच लागला. आणि इतकं अवघड नांव ध्यानांत ठेवण्याचा खटाटोप करण्यापेक्षा आपण आपलं त्याला बभ्रुवाहन सभागृह असं ओळखीचं सुटसुटीत नामकरण (निदान आपल्यापुरतं) करावं काय ? असा एक चोर-र्विचार अथवा पोरविचार मनाला चाटून गेला.. 

कविता सखीचा शुभारंभाचा प्रयोग करायला इतकी नेमकी आणि समर्पक जागा मला एरवी शोधूनही मिळाली नसती. हया प्रयोगाचा विचार नाही म्हटलं तरी गेली दोन तीन वर्षं मनांत घोळत होता. प्रयोगाच्या स्वरूप-आखणी इतकाच त्या प्रयोगासाठी मिळणारा रंगमंच माझ्या दृष्टीनं महत्वाचा होता. रूढ रंग- मंचापेक्षा जरा वेगळा,  नेहमीच्या कलाविश्वातील हमरस्त्यावर न भेटणारा, काहीतरी एक अभिजात अधिष्ठान असलेला असा नॉन कमर्शियल प्रायोगिक मंच माझं अंतर्मन माझ्याही नकळत शोधत होतं.. एका शुभं क्षणी मित्र अरुण काकतकर अगदी सहज म्हणाला, आमच्याकडे दीनायन कलापर्वात करतोस कां ?.. त्या शब्दांनी मला जणू युरेकावस्था प्राप्त झाली.. त्यातून भानावर येताच मी तत्काळ होकार भरला आणि मनातल्या अमूर्त संकल्पनेला आकार देण्याच्या मानसिक प्रक्रियेला प्रकट सुरुवात केली.  

कविता सखीची पार्श्वभूमी खरं तर, वर सांगितली इतकी छोटी आहे.. पण तिचं खरं मूळ शोधायचं असेल तर आजमितीपर्यंत उलटलेल्या आयुष्याची पटलं बाजूला सारीत शोध घ्यावा लागेल.. कवितेचा हा सूक्ष्म नाजूक पण विलक्षण चिवट तंतू पकडून मागे मागे, खूप मागे जावे लागेल..

एवढंच ना..   मग जाउ यां की ..

Wednesday 17 August 2011

स्वगत संवाद - २

मी, एक कवी, आपलं सगळ लेखन संगणक वापरून करतो ही गोष्ट आजही बहुतेकांना पचत नाही. मुळामध्ये आपली कलानिर्मितीची कल्पना फारच नाजूक, तरल, हळवी वगैरे असते. जमिनीवरचे पाय पूर्ण सोडून, आकाशात कुठतरी दूरवर नजर विरघळवून मगच कविता वगैरे जन्माला येतात अशी ह्या मंडळीची पुरेपूर खात्रीच असते. मन बोलू लागणे ही खरं तर लेखनामागची मूलभूत प्रेरणा म्हणता येईल. त्यानंतर होणारं प्रत्यक्ष लेखन ही केवळ शारीरिक क्रिया मानायला हवी. .  मग ते लेखन भूर्जपत्रावर कमलदलान होवो, कागदावर बोरूने होवो, पेन्सिल,फौटन्पेन किंवा बॉलपेनने होवो किंवा आत्ता मी करतो आहे तसं संगणकावर होवो.. आजमितीला विशेषत: ईमेलमुळे त्यासाठी अपरिहार्य असलेल्या टायपिगच्या माध्यमातून बहुसंख्य सर्वसामान्य आणि लेखक कलावत हे देखील संगणकाकडे वाढत्या प्रमाणात वळलेले दिसताहेत. पण सुमारे १९९८ मध्ये म्हणजे तब्बल एक तपापूर्वी मी लेखनासाठी संगणक हे माध्यमं निवडलं तेव्हा परिस्थिती खूपच वेगळी होती.  अशा त्या पार्श्वभूमीवर मला इकडे वळाव असं का वाटलं ही थोडी गमतीशीर प्रक्रिया आहे.

कुठल्याही नव्या संपर्क-माध्यमाकडे, मोबाईल, संगणक, इटरनेट इत्यादी. आरंभी बराच काळ संशयानं, शक्यतो तुच्छतेनं पहाण हा  भारतीय, त्यातही खास करून मराठी बाणा अस्मादिकांमधेही होताच. पण एकेदिवशी एका छोट्याशा घटनेमुळे, खरं तर एका सहज उदगारामुळ मी भानावर आलो.

मुंबईमध्ये एका मित्राच्या ऑफिसात गप्पा छाटीत बसलो होतो.  बोलायच्या ओघात मित्राची कॉलेजच्या वयातली पुतणी एकदम म्हणाली.. काका, तू जर कॉम्प्यूटर शिकला नाहीस ना, तर तू थोड्याच दिवसात निरक्षर ठरशील. ते वाक्य सगळयानी हसण्यावारी नेलं .. पण मला मात्र आतून चाबूक बसावा तसे झालं  त्या क्षणापासून माझ्या मस्तकात हे नवीन संगणक-कुतुहलचक्र फिरू लागलं जे मला इथपर्यंत घेउन आलं असं म्हणता येईल पण ह्याच्या जोडीला आणखीही एक फोर्स कार्यरत झाला होता, जो अधिक महत्वाचा मानायला हवा.

अगदी लहानपणापासून मला हाताने लिहिणे ह्या क्रियेचा अनाकलनीय कंटाळा होता. शिक्षणात परीक्षांमध्ये माझी जी भंबेरी उडायची त्यामध्ये ह्या लेखन-निरुत्साहाचाही वाटा मोठा मानायला हवा.  खरं तर घरांतील संस्कारांमुळे हस्ताक्षर, शुद्धलेखन हया गोष्टी मुळातच अनुकूल होत्या. पण तरीही हाताची बोटं, लिहू लागलं की असहकार पुकारायची . मी कवी झालो ह्यामागेही कमी लिहावे लागणे ही सोय अधिक महत्वाची ठरली असणार.. कारण तिथंही कविता सुचताना झपाझप खरडली जायची.  पण तिचीनीटनेटकी सुवाच्य प्रत करताना माझा जीव आजही मेटाकुटीला येतो.. जन्मजात स्मरणशक्तीचा लाभ भरपूर प्रमाणात झालेला असल्यामुळे सुचलेली कविता मेंदूवर कोरली जाते आणि कविता ख्र्रडलेला तो कागदाचा कपटा कुठ्ल्याकुठे उडून गेला ते कळतही नाही.  माझे एव्हाना सहा कविता-संग्रह् प्रकाशित झाले आहेत. पण त्या श्रेयातील  सिंहाचा वांटा, माझ्या स्मरणशक्ती नामक हार्ड डिस्कवरील निराकार कविता कागदावर उतरवून घेणा-या व्यक्तींना द्यावा लागेल. अशा ह्या एकूण अवस्थेत माझी लेखन ओढ आणि हा लेखन कंटाळा ही युती कशी जमवावी हया पेचात माझं बरच आयुष्य उडून गेलं.. कवितेइतकीच, काकणभर अधिकच असलेली माझी गद्य लेखनाची ओढ त्यामुळे, ऐंशीच्या दशकांत प्रकाशित झालेल्या निरंकुशाची रोजनिशी ह्या एकमेव पुस्तकानंतर बराच काळ घुसमटत राहिली होती.  मागील तीनचार वर्षांत, अनुबंध, गाणारी वाट प्रकाशात आली.  आणि इतर पुस्तकंही झपाट्यानं लिहिली जाताहेत हे श्रेय सर्वस्वी ह्या संगणक माध्यमाला द्यावं लागेल.

एक गंमतीची गोष्ट सांगायला हवी. त्या माझ्या लेखन दुर्भिक्ष्याच्या काळांत मी एक दिवास्वप्न जागेपणीही पहायचो. तेव्हां ती केवळ कवी-कल्पना होती.. माझ्या हस्ताक्षर एलर्जीवर उपाय म्हणून मी चक्क परदेशी लेखकांप्रमाणे छोट्या टंकलेखन यंत्रावर माझं लेखन रूबाबात टम्कित करतो आहे.
(सुसज्ज स्टडी. टेबलावर कॉफी मग, तोंडात पाईप, खरं तर चिरूटच )  पण तेव्हढ्यात एक अणकुचीदार  वास्तव त्या स्वप्नाला छिद्र पाडून जायचं . प्रवाही इंग्रजी भाषेचं ठीक आहे हो, पण अगणित हस्व आणि दीर्घ कानामात्रा,वेलांट्यानी गजबजलेली आपली देवनागरी लिपी आणि तिच्याहूनही क्लिष्ट आणि अवजड असं आपलं ते तत्कालीन मराठी टंक यंत्र (हां शब्द शोधणा-या महाभागास लक्ष दंडवत ) .. पण कवी कल्पना अशी सहजा सहजी हार थोडीच मानते ? मग माझं ते दिवा-स्वप्न कल्पना शक्तीची आणखी एक छलांग मारायचं .मी चक्क इंग्रजी टंक यंत्र वापरतो आहे आणि पुढे कागदावर मराठी उमटते आहे..

कवी अशक्य कोटीतील स्वप्नं पहातात आणि वैज्ञानिक ती सत्यात उतरवतात असं जे वचन आहे ते एक लक्ष एक टक्के खरं आहे. कारण माझं ते अनेक वर्षांचं दिवास्वप्न आज साक्षात साकार झालं आहे. शिवाजी, श्रीलिपी, बराहा, युनिकोड ..ही सर्व मंडळी समस्त म-हाठी लेखकूच्या प्रतिभेचे कोड पुरवण्यासाठी सदैव सिद्ध आहेत.  आणि कवीवचन सर्वार्थानं सिद्ध होतं आहे.

शब्दांचे वेष अनेक .. शब्दांचे देश अनेक
           शब्दांच्या कवचाआड .. शब्दांचे स्पंदन एक

Monday 15 August 2011

स्वगत संवाद - १

स्वगत-संवाद... ही शब्दांची जोडी माझ्या खूप लहानपणीपासून ओळखीची आहे. खरं तर हे दोन विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत.  दोन्हीकडे व्यक्त होणं आहे.  मात्र पहिल स्वत:च्या मनाशी बोलणं आहे. म्हणजे अप्रकट आहे . तर दुसरं हे प्रकट स्वरूपातील आहे ..बालपणी मी खूपच अबोल, खरं म्हणजे घुमाच होतो म्हणाना.. थोडा (थोडा कसला?) भीषण स्वप्नाळू स्वभावही होताच.. झोपेत तर सोडाच, पण जागेपणीही स्वप्न सुरू असायची.  त्यात  नेमकं काय असायचं, कुणास ठाउक ..पण त्यात खूपच रमलेला असायचो. त्यामुळे अखंड स्वतःशी बोलणं चालू असायचं. अर्थात पूर्णपणे स्वगत स्वरूपात.. पुढे मोठेपणी त्या अबोल स्वभावाचां कसा कोण जाणे, पण एकदम पूर्ण बोलघेवडा अवतार जन्माला आला.. तो अजूनही तसाच आहे. तरीही अलीकडे त्या मुळातील स्वगताची खूप ओढ अचानक वाटू लागली आहे. .. आणि त्यातून ही शब्द-युती पुन्हा जवळची वाटू लागली आहे.  .

माझा कविता पानोपानी हा रंगमंचीय काव्यप्रयोग मी १९८७ च्या गुढी पाडव्याला सुरू केला. त्यावेळी पडदा उघडण्यापूर्वीच निवेदन लिहिताना नकळतपणे मी ही  शब्दयुती वापरली होती. स्वत:च्या काव्याबद्दल बोलताना मी असं म्हटलं होत .. "अंत:करणतून येणा-या थेट सहज उद्गाराइतकी साधीसुधी आणि कसलाही पवित्रा नसलेली ही नाद-मुग्ध, बहुरूपी कविता म्हणजे एक संवाद आहे आणि स्वगतही." अगदी सहजपणे व्यक्त केलेली ही भूमिका पुढे प्रत्यक्ष प्रयोगात अधिकाधिक स्पष्ट होत गेली. स्वत:लाच त्या विधानाची प्रचीती पुढची उणीपुरी वीस वर्ष उमगत आणि उमजतही राहिली.  रंगमंचीय प्रयोगाची एक अट म्हणून मी प्रेक्षागृहात पूर्ण काळोख ठेवायचो.  कवी आणि रसिक ह्यांच्यातील थेट संवादाच्या दृष्टीने ही गोष्ट खरंतर पूर्ण विघातक .. पण प्रत्यक्ष अनुभव फार सुखद होता.  कविमनाची केवळ समूहमनाशी नव्हे तर समूहातील व्यक्तीमनाशी जोडणी होत असल्याची  वारंवार अनुभूती येत राहिली.  तो अनुभव केवळ अपूर्व असायचा. आज मुळात मी प्रयोग अधूनमधून करतो तेव्हाही तो अनुभव मी पुन्हापुन्हा घेत असतो.

आता असं मनात येतय की तोच अनुभव स्वांत:सुखाय लेखनातूनही घ्यावा. आणि म्हणूनच हे लिहू लागलो आहे.   मानस असा आहे की, कसलीही सक्ती नाही पण, दिसामाजी काहीतरी ते लिहावे हा समर्थ रामदासांचा संदेश जरा मनावर घ्यावा  मनांत उठणारे तरंग येतील तसे शब्दबद्ध करीत जावे आणि ह्या नव्या अनोख्या नेट-माध्यमातून हा नवा स्वगत-संवाद नेट लावून चालू ठेवावा.

तेव्हा जरा प्लीज..
मना सज्जना, हे मनी बाणवावे...