Saturday 29 October 2011

स्वगत संवाद - १६

सुजाण.. समृद्ध.. प्रयोगशील..

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा सांगोपांग वेध लेखनाद्वारे घेऊ जाणे हा शब्दमाध्यमाची कसोटी पाहणारा प्रयोग ठरेल. पण तरीही कमीत कमी शब्दांत त्यांची ओळख करून द्यायची झाली तर केवळ सहा शब्दही पुरेसे ठरतील. मराठी भावसंगीताची क्षितिजे विस्तारणारे प्रतिभावंत संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.  भारतीय अभिजात शास्त्रीय रागसंगीत, त्याचे ठुमरी, दादरा, कजरी आदी ललित उपप्रकार, एकीकडे बहुजनसमाजाला मोहविणाऱ्या लोककला आणि त्यातून प्रवाहित झालेले लोकसंगीत या दोन्हीतून जन्म घेऊन बहरत गेलेले नाटय़संगीत आणि विज्ञानयुगाचा हात धरून सुरू झालेले चित्रपटसंगीत असा परंपरेचा केव्हढा तरी विस्तृत पट आपल्याला लाभलेला आहे. या पाश्र्वभूमीवर १९३० च्या दशकात आधुनिक मराठी कविता आणि नामवंत कवींचे तत्कालीन लहानथोर रसिकांना  आवडणारे काव्यगायन यांतून एक अभिनव ललित गायनप्रकार सुरू झाला आणि पाहता पाहता त्याने अवघे रसिकविश्व व्यापून टाकले. कानामागून येऊन तिखट झालेला हा मराठी ‘भावगीत’ नावाचा छोटासा झरा आज पाहता पाहता त्रिखंड व्यापून टाकताना दिसतो आहे. पण त्याचेही नवल वाटायला नको. कारण आधी उल्लेखिलेल्या परंपरेच्या मूलतत्त्वांतूनच मराठी भावगीताचे भरणपोषण झाले. आजही ती प्रक्रिया चालू आहे. इतकेच नाही, तर भविष्यातही ती अखंड चालूच राहणार आहे. त्याच्या जोडीला नव्या वैश्विक संगीताचे अनेकानेक प्रवाह आणि त्यांची आपापसात होणारी देवाणघेवाण यातून एक नवीच सांगीतिक परिभाषा आकार घेत जाईल असे एकूण चित्र दिसते आहे. या सर्व प्रवासात मराठी भावसंगीतामध्ये १९६० च्या दशकापासून सुरू झालेल्या एका नव्या आधुनिक भावगीत-युगाला अनन्यसाधारण स्थान आहे. आणि ते महत्त्वाचे वळण देणारी जी मोजकी नावे आहेत, त्यामध्ये सिंहाचा वाटा नि:संशय पं. हृदयनाथ मंगेशकर या नावावर नोंदवला जाईल याविषयी दुमत होण्याचे कारण नाही.
 
हृदयनाथांविषयी बोलताना त्यांना केवळ मराठी भावसंगीतापुरते सीमित करणे असमंजसपणाचे ठरेल. हिंदी आणि मराठी संगीतविश्वाच्या विशाल पटावर त्यांचे काम समजावून घ्यायला हवे. कारण एकतर ते संगीतकार म्हणून १९५० च्या दशकात प्रथम प्रकट झाले ते त्यांच्या दोन अवर्णनीय मधुर हिंदी रचनांनी.. ‘बरसे बुदिया सावनकी, सावनकी मनभावनकी’ आणि ‘निसिदन बरसत नैन हमारे..’ लता मंगेशकरांच्या ऐन भरातील साक्षात्कारी स्वराने भिजलेली ही दोन गाणी ऐकणे हा आजही एक शब्दातीत अनुभव ठरतो. आणि या अजोड स्वररचना वयाची विशीही न गाठलेल्या संगीतकाराने बांधल्या आहेत, या गोष्टीवर विश्वास ठेवणे जड जाऊ लागते. पण दुसऱ्याच क्षणी ती खात्रीही पटते. कारण त्या स्वरांना लगडलेली विलक्षण निर्मळ शुद्धता ही त्या वयाच्या कोवळेपणातूनच येऊ शकते, हेही आपल्या ध्यानात येतं.  या दोन गाण्यांतून व्यक्त झालेली त्यांची स्वरप्रतिभा किती विविध वळणे आणि किती विविध उन्मेष दाखवीत पुढे चालू राहिली आणि आजतागायत चालू आहे! त्यांच्या त्या प्रवासाचा, त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांचा साद्यंत परामर्श हा एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय ठरेल. पण एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवते की, त्यांचा हा सारा प्रदीर्घप्रवास एखाद्या  बोझदार विलंबित ख्यालाच्या अंदाजाने चालला आहे. त्यामध्ये कुठेही असुरक्षित, बुभुक्षित घिसाडघाई दिसत, जाणवत नाही. याचं सर्व श्रेय दैववशात लाभलेल्या सुस्थित परिस्थितीला देऊ पाहणं अन्यायाचं होईल. कारण कलावंत म्हणून असलेल्या  मूलभूत भूमिकेमध्ये रु जलेली ही स्थिरता आणि संयतता ही बाह्य परिस्थितीतून जन्मत नाही. ती मुळामध्ये तुमच्या वृत्तीतच सामावलेली आणि भिनलेली असावी लागते.  एरवी आपल्या घरातच एक जन्मसिद्ध आणि दुसरी प्रयत्नसिद्ध अशा दोन सार्वभौम सम्राज्ञी नांदत असताना एखाद्याने तेव्हढय़ा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा निर्थक, वायफळ प्रयत्न करीत आपले उभे आयुष्य वाया दवडून टाकले असते. पण असे  काही न करता त्या अलौकिक आणि लौकिकभरल्या घरातही हृदयनाथांनी आपली कलासाधना ‘एकला चालो रे’ थाटात संथ लयीत चालू ठेवली. त्या अलौकिक तेजोवलयाचा आदर राखीत त्यांनी आपल्यासमोरचा काळोख स्वत:च्या निरंतर अभ्यासातून आणि अखंड साधनेतून उजळवून टाकला आणि त्यातूनच आपली स्वत:ची प्रकाशवाट रेखीवपणे कोरीत ते इथपर्यंत येऊन पोचले आहेत.
 
खरे पाहता एकीकडे त्यांनी ख्यालिया गायक होणं हे अधिक ओघानं येणारं होतं. एकतर त्यांचा प्रकृतिधर्म त्याला अनुरूप होता. अमीरखांसाहेबांकडे त्यांची शागिर्दीही चालू होती. ‘चाला वाही देस’मध्ये किंवा ‘लेकिन’ चित्रपटात त्यांच्या रियाजी गळ्यातील शक्यतांची आजही चुणूक मिळते. शिवाय नेणतेपणी अस्तित्वात रु जलेले मा. दीनानाथ हळूहळू जाणवू लागले असणार. कदाचित त्यांच्या चिजांच्या वहीतून स्वाध्यायही सुरू झाला असेल. पण याचवेळी एकीकडे ते कुमारवयात असताना  हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ चालू होता. तेव्हाच्या एकाहून एक तेजाळ सांगीतिक प्रतिभा त्यांना जवळून निरखायला आणि पारखायलाही मिळत होत्या.  आणि त्या सर्वाचं सार्थक करणारा केंद्रबिंदू असा लता नामक अद्भुत स्वर त्यांच्या थेट समोर अगिणत उन्मेष दाखवीत फुलत, बहरत होता. शिवाय या सर्वाच्या जोडीला साहित्याचं डोळस वेड जडलं होतं. विशेषत: कवितेशी जवळीक होत चालली होती. त्यातील प्रायोगिक नावीन्याची मनाला ओढ होती. आणि त्याचवेळी जुन्या-नव्या संत-पंत-तंत कवींची कविता मनात रूंजी घालत होती. यातून आकाशवाणीशी संबंध येऊ लागला. राजा बढेंसारख्या ज्येष्ठ राजस कवींनी प्रेरणा दिली. त्यांच्यातील सुप्त संगीतकार जागा होऊ लागला. आणि तिथून ‘नित्य नवा दिस जागृतीचा’ असा हा प्रवास सुरू झाला. ‘अभ्यासोनी प्रगटावे’ हे समर्थ-वचन आपल्या जगण्यातून साकार करीत जगलेल्या व्यक्तीमालिकेत हृदयनाथांचा समावेश ठळक अक्षरात अग्रभागी होईल.
कुणाचेही श्रेय सहजासहजी मान्य करणे हा मराठी स्वभाव नाही. हा दोष म्हणावा की चोखंदळपणा, हीदेखील तशी सापेक्ष गोष्ट आहे.
 
पण एक खरे, की हृदयनाथांनी जसा त्यांचा प्रवास ख्यालाच्या संथ, ठाय लयीत केला तसाच त्याचा स्वीकारही आपण मराठी जनतेने तसाच, किंबहुना जरा अधिकच विलंबित लयीत केला. पण कधीही आणि कुठेही त्या- त्या काळातील प्रस्थापित प्रवाहांवेगळी दिशा शोधू पाहणाराला कसोटी घेणाऱ्या दिव्यातून जावेच लागते. आणि मंगेशकर या आडनावाला ही गोष्ट मुळीच अनोळखी नव्हती. अगदी बाप-लेक म्हटले तरी त्यांच्यात तुलना अयोग्यच; पण तरीही मा. दीनानाथांनी त्यांच्या काळात केलेला प्रवाहाविरु द्ध स्वयंभू शोधप्रवास आणि आजवरची हृदयनाथांची वाटचाल या दोन्हीमध्ये कुणाही अभ्यासकाला बिंब-प्रतिबिंबाचा प्रत्यय आला तर त्यात नवल ते काय? पण कदाचित त्यामुळेच,  स्वरप्रतिभा आणि स्वरभूमिका या केवळ दोन निकषांवरही हृदयनाथ मंगेशकर सर्वार्थाने आपल्या तीर्थरूपांचे निखालस वारस ठरतात, हे मात्र खरे.
 
अशा अभिजात प्रतिभावान व्यक्तीसाठी वय हे केवळ त्यांच्या सत्कारासाठी असलेले  एक तात्कालिक निमित्त असते. एरवी निवृत्ती त्यांच्या संदर्भात संभवत नाही. तिथे ‘निवृत्ती’ या शब्दाला एकच पर्याय असतो :  नव-वृत्ती! 
 
हृदयनाथांची ही नव-वृत्ती अधिकाधिक डोळस आणि तजेलदार होत राहो, ही शुभेच्छा.

* * * * * * *
लोकसत्ता, दिनांक २६ ऑक्टोबर, पं हृदयनाथ मंगेशकर विशेष पुरवणीसाठी अतिथी संपादक म्हणून लिहिलेला लेख

Saturday 22 October 2011

स्वगत संवाद - १५


तुम्ही आठवणीतले दिवस लिहा म्हणून सांगितलं आणि नाही म्हटलं तरी माझा ब-यापैकी गोंधळ उडाला.. एक कलाकार आणि माणूस म्हणून जाणीवपूर्वक जगण्याची चार दशकं पहाता पहाता उलटली म्हटल्यावर आठवणीतल्या दिवसांची मालिका ही,  आजच्या भाषेत बोलायचं तर अनेक वाहिन्यांच्या अनेक एपिसोड्सचा ऐवज होण्याइतकी साठली आहे. नेमकं कुठलं चेनेल उघडावं हा संभ्रम खरं तर ह्या क्षणापर्यंतही संपलेला नाही.. शेवटी ठरवलं की डोळे झाकून नाणे-फेक करावी आणि लिहू लागावं.. पाहू कुठले दिवस वर आपसूक उसळून येतात ते.....नंतर मग त्याचंच आख्यान लावू... शेवटी कीर्तनकराचा मुलगा मूळ पदावरच जाणार की..  तर आजचा विषय आहे, माझे मुंबईतले दिवस.  खरं म्हणजे तो तसा स्वतंत्र पुस्तकाचाच  विषय आहे. १९७३ मध्ये माझं हे मुंबई-अफेअर सुरू झालं ते जवळ जवळ १९९७ पर्यंत म्हणजे सलग पंचवीस वर्षं  चालू राहिलं.. कारण ह्या सर्व काळात मी मुंबईचा हंगामी स्वरूपाचा कां होईना पण अखंड रहिवासी होतो. मुंबईची पहाट, सकाळ, ऐन मध्यान्हीची दुपार, कलती दुपार, निवत चाललेली संध्याकाळ, समुद्रात विलीन होणारी मावळती, त्यापाठोपाठची, उतरली तारकादळे जणू नगरात अशी झगमगती रात्र- मध्यरात्र आणि थकव्याची कसलीही चिन्ह न दाखवणारी रसरसलेली उत्तररात्र हे सगळं चक्र मीही सर्वांगानं पाहिलं, अनुभवलं-भोगलं आहे.  त्यातले हे काही मोजकेच अंश..

लहानपणी खरं तर मुंबई ह्या शहराची मला प्रचंड धास्तीच होती. एका छोट्याशा सुव्यवस्थित टुमदार गांवात जन्मला-वाढल्यामुळे असेल, पण कोशातील रेशमी किडा किंवा ट्यूबमध्ये उगवलेला जीव, तसा मी होतो. त्यामुळं मुंबईच्या अवाढव्य विश्वांत जाणे  ही नुसती कल्पनाही दाणादाण उडवणारी वाटायची  परंतू नियतीच्या योजनेचा जो प्रवाह मला बालपणापासून आवडणा-या पुण्यात घेउन आला तो प्रवाह मला पुण्यात  रेंगाळू न देता थेट मुंबईत  पोचवल्यावरच पुन्हा मूळ गती घेउन वाहता झाला.   त्यानंतर मात्र त्या महानगरानं मला खूप मायेनं स्वत:त सामावून घेतलं. आणि दोन पायांवर ताठ उभं रहायलाही शिकवलं आज जो मी कुणी आहे, त्या माझ्या होण्या आणि असण्यामध्ये मुंबईचा वाटा फार मोठा आहे. जे काही माझी कमाई म्हणता येणार नाही असे भाग्य-योग आहेत, तीही मुंबईचीच देणगी आहे.

माझे मुंबईतले दिवस म्हटलं की किती गोष्टी मनांत जाग्या होऊ लागतात.. ह्या प्रदीर्घ काळात जिथे जिथे मी राहिलो त्या वास्तू, ते परिसर, तिथल्या विविध वयाच्या द्न्यात आणि अद्न्यात व्यक्ती, मित्र-मैत्रिणी, सुहृदपरिवार, कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ कनिष्ठ सहकारी, चित्रीकरणाचे आणि ध्वनीमुद्रणाचे   स्टुडियो, मुंबईचा समुद्र, वरळी सीफेस, बांद्रा बेंड-स्टेन्ड, मुंबईच्या झगमगत्या आणि काळोखी रात्री, त्यातील चैतन्य, उन्माद आणि अपरंपार भयही ...

हेमिग्वेच एक सुंदर पुस्तक आहे...मुव्हेबल फीस्ट ह्या नांवाचं.. त्याच्या ऐन तारुण्यातील पेरिसच्या आठवणी त्यांत त्यानं लिहिल्या आहेत. त्या पुस्तकाचं हे सुंदर शीर्षक हेमिंग्वेच्या एका खाजगी पत्रातून घेतलं. आहे. ते वाक्य एखादी कवितेची ओळ रहावी तसं माझ्या स्मरणात कोरलं गेलं आहे. माझं इंग्रजी आणि एकूणच व्याकरण ह्या गोष्टींचा अगाध आनंद आहे.  पण त्याच्या ह्या वाक्यरचनेत काही गडबड आहे कां असं मला एकीकडे वाटतं. आणि तरी ते लयदार वाक्य मला आहे तसंच आवडतं.  तो म्हणतो

                                   If you are  lucky enough to have lived in Paris
                                   as a young man,
                                   then wherever you go for the rest of your  life,
                                   it stays with you,
                                                                 for,  Paris is a Moveable Feast..


माझे मुंबईतले ऐन उमेदीचे  दिवस आठवले की मला हे वाक्य न चुकता आठवतं. ते  पुस्तक सपवताना  आलेलं एक छोटंसं वाक्य तर मला माझं आणि देबू, प्रदीप, राजू, सुहास, बाबा,अरुण  ह्या आम्हा दोस्त कंपूचं  मनोगत वाटतं. 

                                    Those were the days, when we were very young
                                                           very poor and very happy..

वाचक मित्रानो, घाबरू नका.  मला मुंबईची बरोबरी पेरिसशी करायची नाहीये. माझ्या मुंबईतील आठवणी वेगळ्या आणि ते मुव्हेबल फीस्ट निराळं.
                  ..  आणि शिवाय,
                     मी तरी अर्नेस्ट हेमिंग्वे थोडाच आहे ?

*****************

तसं पाहिलं तर मुंबईमध्ये माझा राहण्याचा प्रश्न खूप बिकट नव्हता. दादा-वहिनी खारला होते. मोठी बहीण हेमाताई (श्रीखंडे) विलेपार्लेमध्ये..  पण तरीही मुंबापुरीत माझे कमी-अधिक मुदतीचे  अनेक मुक्काम झाले.    .कारण कां कुणास ठाउक, पण मुंबईमध्ये कायमचं घर करायचं नाही असं मी जणू माझ्याही नकळत ठरवलेलं होतं. मात्र  त्याचबरोबर ते सगळे मुक्काम ठराविक मुदतीचे असले तरी ती मुदत संपली तरी मध्ये फारसा अवकाश न जाता पुढच्या मुक्कामाचं नवं अवकाश जणू माझी वाटच पहात असायचं. वडाळा, वरळी सी फेस, केडेल रोड, बांद्रे (पूर्व),, प्रभादेवी, डी.एल.वैद्य रोड, दादर, शिवाजी पार्क, गोरेगांव पूर्व ही त्यातली ठळक नांवं.. ह्याखेरीजही जोडलेली नाती आणि त्यातून मिळणारा लोभ ह्याबातीत अस्मादिक प्रथमपासून आजतागायत अंमळ भाग्यवानच.

१९७४ मध्ये कवी म्हणून केलेला पहिला चित्रपट. राजा शिवछत्रपती ..त्या निमित्तानं संगीत दिग्दर्शक वसंत देसाई ह्यांच्या शिवाजी पार्कवरील परिमलवर तळ पडलेला असायचा. एकदा तिथं भालचंद्र पेंढारकर आले होते.  मुंबईतला पत्ता कोणता असं त्यांनी विचारल्यावर वसंतरावजींनी मी तोंड उघडायच्या आत त्यांना, परिमल, शिवाजी पार्क, असं परस्पर उत्तर देउन टाकलं होतं.  पुढे हा खेळ सावल्यांचा, जानकी, संसारच्या निमित्तानं गीतनिर्मितीच्या बैठकी झडत होत्या ..तेव्हां अशाच एका चौकशीला ह्रदयनाथ मंगेशकर परस्पर सांगते झाले, प्रभूकुंज, पेडर रोड... आणि सुधीर फडके तथा बाबूजीनीही एकदा शंकरनिवास, शिवाजी पार्क, रस्ता, क्रमांक ३  हा माझा पत्ता म्हणून सांगितला. आणि खरोखरच  ते तर सर्वार्थानं माझं निवास्थान होतंच. . कांम  असताना आणि नसतानाही कितीतरी काळ मी त्या घरांत फडके परिवाराचा सदस्य म्हणून व्यतीत केला आहे. ही सर्वाना ठाउक असलेली नांवं झाली..पण ह्या पलीकडेही अनेक घरं मुंबईत अशी होती की ज्याची दारं माझ्यासाठी दिवसाच्या कुठल्याही प्रहरी स्वागताला सज्ज असायची.

मुंबईत राहू लागल्यावर काही दिवसातच मला एक मजेदार अनुभव आला होता. प्रथम ती जाणीव मला झाली तेव्हां माझं मलाच आश्चर्य वाटलं होतं.  तेव्हां खरं तर माझं अधिकृत घर (भाड्याचं कां होईना) पुण्यातील भोंडे कॉलनीत होतं.  तिथं चक्क माझी वाट पहाणारे आईवडील होते.. पुण्यातही दोस्तपसारा मजबूत होता. शिवाय माझं आवडतं दुसरं घर म्हणून फर्ग्युसन रोडवरचं केंफे डीलाईट होतं.   त्या तुलनेत मुंबई खरं तर काहीच्याबाही अफाट आणि अनोळखी होती.  पण तरीही मुंबईत प्रवेश केला की  एकदम मला खूप सुरक्षित वाटू लागायचं. ह्या अजब मानसिकतेचं मला फार नवल वाटायचं ..पुढे हळूहळू ह्या कोड्याचा आपसूक उलगडा होत गेला. कारण प्रत्येक  शहराचा, गावाचा स्वतचा असा एक  स्वभाव असतो. तसा मुंबईचाही एक स्व-भाव आहे...

मुंबई सर्वार्थानं सर्वसमावेशक आहे. मुंबईच्या ह्या सर्वसमावेशकतेचं एक अगदी जितंजागतं प्रत्यंतर तुम्हाला लोकलच्या प्रवासात केव्हाही पहायला सापडेल. माणसांनी भरभरून ओसंडणारी लोकल स्टेशनवरून हलून वेग पकडू लागते.  तेव्हांही काही माणसं धावतपळत ती धावती लोकल पकडायचा प्रयत्न करतात. तर डब्यातली अगोदर लटकणारी माणसं त्यांना कमरेत हात घालून अलगद आंत घेतात. दररोज देशातील सर्व दिशांकडून येणा-या गाड्यातून अगणित माणसं मुंबईत ओतली जातात आणि ती पहाता पहाता मुंबईच्या गर्दीत सामावूनही जातात.  काम करायची तयारी असलेल्या कुणालाही मुंबई फारकाळ उपाशी ठेवत नाही. तिला मायपोट म्हणतात ते उगीच नाही. जगण्याच्या पातळीचे जितके म्हणून थर म्हणावे ते सारे मुंबईत आहेत.. उलट काही थोडे अधिकच असतील.  पण त्या सर्व थरांना लागणा-या अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत सोयी मुंबईमध्ये उपलब्ध आहेत.  त्याच्या सर्व क्षुधाना इथे खाद्य आहे. फक्त त्याच्यामध्ये जगण्याची विजिगीषा हवी..  मैदानमें गर हम डट जांये, मुश्किल है कि पीछे हट जांये हे  न्रीदवाक्य स्वत:मध्ये बाणवून जो जगेल त्याला मुंबई छप्पर फाडके देउ शकते, त्यातले अपवाद गृहीत धरूनही ..

इरावती कर्वेचं परिपूर्ती हे पुस्तक माझं खूप आवडतं आहे. त्यातही त्यातला वेड लागलेलं घर हा लेख.  घरात पोरांचा चालणारी बेफाम धावपळ आणि आईचा धास्तावलेला जीव.. अरे नंद्या, तो टेबलाचा कोपरा तुझ्या डोळ्यात घुसेल, संभाळ ,,तेव्हढ्यात, तो कोपरा  हळूच स्वत:ला आंत घेतो. अग, तुझं डोकं भिंतीवर आपटतंय म्हणावं तोवर ती भिंतच स्वत:ला आक्रसून घेते.. त्या पुढे म्हणतात, दंगेखोर पोरांना आपलं घरच सांभाळून घेत असतं.  मुंबई हे माझ्या दृष्टीनं असंच वेड लागलेलं महानगर आहे.

मुंबईच्या आठवणी सांगायच्या ठरवल्या तर आयुष्य संपुन जाईल कदाचित, पण आठवणी संपणार नाहीत.  मात्र  त्यातली एक अगदी साधी पण मजेदार आठवण आत्ता सांगाविशी वाटते आहे. ती फार काही प्रातिनिधिक नक्कीच नाही. कारण ती पूर्णपणे माझी व्यक्तीगत आठवण आहे.  पण तरीही ही ऐकून आणखी कुणाला, विशेषतः माझ्यासारख्या फ्री लान्स आयुष्य मुंबईत जगलेल्या व्यक्तीला अशाच प्रकारचे समांतर अनुभव आठवले,  तर मला नवल वाटणार नाही.. कारण, मुंबईचे माझे दिवस एकूण काय आणि कसे होते ह्याची एक झुळूक म्हणावी अशीच ही आठवण आहे.  प्रीतीवांचून मरावे हेची असेल प्राक्तन, प्रीतीवांचून जगेन हे माझं गाणं  रेकॉर्ड झालं, त्या दिवशीची ही गोष्ट आहे. मुंबई दूरदर्शनवर अरुण काकतकर करीत असलेल्या एका दिवाळी कार्यक्रमासाठी ते गाणं मी केलं होतं.. कवी आणि संगीतकार ह्या दुहेरी नात्यांनी.. गायिका होती देवकी पंडित, वय वर्षे १२ ..त्या वेळी मी शिवाजी पार्क भागातील डी. एल. वैद्य रोडवर अरुण काकतकरच्या घरीच रहात होतो. सकाळी दूरदर्शन केद्रावर जायची तयारी करीत असताना लक्ष्यात आलं की आपल्या पाकिटात पैशाचा ठणठणाट आहे.. घाबरून जायचा प्रश्न नव्हता कारण ही नवी गोष्ट नव्हती आणि घाबरून काहीच होत नाही हे एव्हाना पुरतं पटलेलं होतं. शिवाय आपल्या खिशातून जाणारा पैसा आपल्या आयुष्यातला शेवटचा पैसा आहे असा धाक मला कधीच वाटत नव्हता. मधून मधून ही मध्यंतरं येत रहायची पण त्यांच्या अस्तित्वाच्या सुरक्षेसाठी कां होईना पैसाही येत-जात रहायचा .. शिवाय, मुंबईतील त्या संघर्षकाळाच्या सलामीलाच माझ्या दोस्तांनी मला पढवलं होतं.  मुंबईत आपण एकत्र कां राहतो तर प्रत्येकावर वेळ येत असते म्हणून..  तेव्हां ती आली की पडेल ती मदत करायची आणि घ्यायचीही .. तेव्हां टी.व्ही त  गेल्यावर अरुणकडून गरजेपुरता श्वासोच्छवास मागून घेउ असं मनाशी म्हणून मी मार्गस्थ झालो.

शूटिंग, रेकॉर्डिंग, रिहर्सल ह्या गोष्टीच अशा आहेत की त्यांत घुसलं की मग इतर काही भानच रहात नाही.. सकाळी १० ते ४ वेळ कसा गेला कळलंच नाही.  गाणं मस्त पार पडलं. गाण्याचे शब्द आणि गायिकेचं वय ह्या गोष्टी भलत्याच व्यस्त होत्या. त्यामुळं आरंभी भोवतालची मंडळी अंमळ साशंक होती. पण तिचं वय लहान असलं तरी आवाजातली मूलभूत परिपक्वता हेरूनच तर तिची निवड मी केली होती.. त्यामुळं मी तसा पूर्ण नि:शंक होतो.  पण माझी ती नि:शंकता वास्तवातही सिद्ध झाल्यामुळे एकप्रकारचा सुगंधी माज अवघ्या अस्तित्वात दरवळत होता. त्या धुंदीत मी सर्व टीम घेउन टी.व्ही केटीनमध्ये गेलो. एव्हांना आर्थिक वास्तवाचा पूर्ण विसर पडला होता. मी रूबाबात प्रत्येकाला काय हवं असं विचारून नेहमीच्या संवयीप्रमाणे जोरदार ऑर्डर दिली.  त्याचवेळी पलीकडच्या टेबलवर अरुणचे सहाय्यक राणे बसले होते.  त्यांचं आधी लौकर आटपल्यामुळे ते आमचा निरोप घेउन निघाले.  अगदी अनपेक्षितपणे काउंटरपाशी गेल्यावर त्यांनी त्यांच्या बरोबर आमचंही बिल दिल आणि मला ते दुरून खूण करून सांगितलं. पुढचा एक जाहीर अब्रूनुकसानीचा प्रसंग त्यामुळे आपसूक टळला हे खरं.. पण त्याचबरोबर दाहक वास्तवाचं भानही पुढे टोलवल गेलं ..

त्यादिवशी रेकॉर्डिंग ऐकायला मुद्दाम आमची वहिनी आली होती.  ती डॉक्टर, त्यामुळे संध्याकाळी तिचं  क्लिनिक म्हणून ती निघणार होती.. निघताना घरी येणार कां म्हणून तिनं विचारलं.  अरुणला त्यादिवशी मीटिंग होती आणि मीही बरेच दिवसात घरी गेलो नव्हतो त्यामुळे मी वहिनीबरोबर निघालो..वरळी ते खार विनासायास घरी.. खिशाला हात लावण्याचे प्रसंगच जणू दूर दूर पळत होते.  घरून ती  क्लिनिकला निघाली.  तेव्हां खरं तर तिनं येणार कां म्हणून मला विचारलं ..कारण साहित्य सहवासमधला  माझा अड्डा तिला ठाउक होता.  पण मी डौलात तिला, तू जां ..मी जरा नंतर निघणार आहे (हो ,पण कसा ?) असं सांगून बैठक आणखी ऐसपैस केली.

असा काही वेळ गेला आणि फोन वाजला.  दूरदर्शनच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एक  छान कॉफी कलरची साउथ इंडियन नवी मैत्री झाली होती.  ती आणि तिचं घर खरोखरच अगत्यशील होतं. फोन तिचा होता.  तिच्या घरी काहीतरी छोटा घरगुती कार्यक्रम होता. म्हणून ते निमंत्रण करणारा तो फोन होता. मी अर्थात नेकी और पुछ पुछ ? अशा थाटात पोचतो तासाभरात असं सांगून फोन ठेवला ..खिशात हात घातला आणि चटका बसला.  इथं बाहेर डोकं काढण्याची मारामार आणि सायनपर्यंत कसला जातोय..?. तिचा फोन स्मरणात नसल्यामुळे तिला कळवण्याचा प्रश्नच नव्हता..  नेमकं काय करावं न सुचून प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसा साहित्य-सहवासमध्ये राजूला फोन फिरवला. राजू आमचा जिगरी दोस्त. दिनकर साक्रीकरांचा मुलगा.  आता तोही घरी नसेल तर ?..  आत्महत्येचे ९९९ सुलभ मार्ग नामे निराकार पुस्तकाचे चिंतन सुरू करावे.  पण नाही, अजून इहलोकीचे अवतार-कार्य संपले नसावे.. कारण फोन चक्क राजूनेच उचलला. आणि प्रफुल्लीत स्वरात, अरे काय करतोयस, ये की इकडे म्हणून सांगितलं. (आज फिर जीनेकी तमन्ना है, आज फिर मरनेका इरादा है  ..वगैरे) मी एकच वाक्य बोललो.. लगेच निघतो टेक्सी करून.....पण तू जरा खाली उतर ..(कळण्याचा चाले कळण्याशी संवाद हे कविवचन फक्त मैत्रिणीपुरतंच नाही बरं..).. अल्पावधीत इष्ट स्थळी पोचलो. राजू साहित्य सहवासच्या फाटकात उभाच होता. त्यानं माझी सोडवणूक करून वर घरी नेलं. मी त्याला सायन-निमंत्रण सांगून ते सहमित्रपरिवार असल्याची ग्वाही दिली. पण त्याचेही खिसे त्याला धोक्याचे अलार्म देणारे होते. . जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया ही शिकवण पुरती बाणलेली असल्याने आम्ही लगेच प्राप्त परिस्थितीत शक्य असलेल्या योजना आखायला सुरुवात केली.  तेव्हढ्यात.. .राजूच्या बाबांचा  म्हणजे दिनकर साक्रीकाराचा घरात नाट्यमय  प्रवेश.  (तसे तेही आमचे ज्येष्ठ मित्रच. म्हणजे राजूचेही) त्यांचे ते नाट्य-संजीवक अमृतमधुर शब्द ..  अरे मी माटुंग्याला निघालोय. तुम्हाला कुठे सोडायचं आहे कां ?.. आम्ही ताडकन उभे...

तात्पर्य,  आमचं सायन, तलम डोसा, माझ्या आयुष्याचा केवळ प्राणवायू असलेली अस्सल फिल्टर कॉफी ..सारं काही साग्रसंगीत .. पुन्हा रस्त्यावर आलो तेव्हां राजू एकदम म्हणाला .. देबूकडे जाउया कां ? देबू प्रभादेवीला रहायचा ..(पण तो असेल का ? असले दळभद्री संदेह एव्हाना पुरते जमीनदोस्त झाले होते. .) मी त्याला होय म्हणतोय  तोंवर मुद्दाम बोलवावे तशी समोर.लालभडक तजेलदार  ८५ लिमिटेड उभी. ..आवडता वरचा डेक ..काही क्षणांत प्रभादेवी.  दारात देबू.. वाटच पहाणारा.. अल्पावधीत आम्ही योग्य स्थळी प्रस्थापित.  मध्ये जी असावी ती सामुग्री ..गप्पा, हास्यविनोद, .. सगळी मुव्हेबल फीस्ट मागील पानावरून पुढे चालू.... खिशातील मोकळं पाकीटही माझ्याइतकंच तृप्त ..सैलावलेलं ..

              रात्री अंथरुणावर पाठ टेकताना
              जुनीच शब्दयोजना नव्या अर्थानं
                  अंत:करणपूर्वक ओठावर आली .

                                 Hats off,  बम्बई मेरी जान..

Saturday 15 October 2011

स्वगत संवाद - १४


परवा अचानक आशय फिल्म क्लबच्या सतीश जकातदारचा फोन आला. आज संध्याकाळी अर्काईव्ह थिएटरमध्ये दास नावाच्या बाईनी केलेल्या चार डॉक्युमेंटरी दाखवतोय. जरा दुर्मिळ आहेत..पहायला येच. साहजिकच संध्याकाळी हजर झालो. प्रख्यात नर्तक-रचनाकार  उदयशंकर, भारतीय रागसंगीतगायनाची पायाभरणी  करणारे श्री.  कृष्णराव पंडित आणि त्या घराण्याचा इतिहास ह्यांची ओळख, आपल्या गायन-निवेदनातून जिवंत करणारी त्यांची नात मीता पंडित,  सरोदवादक अमजद आली आणि विश्वविख्यात  रविशंकर असे चार विषय ह्या दासबाईनी हाताळले आहेत.  त्यांची स्वत:ची अशी एक स्वतंत्र शैली जाणवली... प्रवाही संकलन हे त्यांचं  प्रमुख बलस्थान वाटलं.. अर्थात बोधपट निर्मितीत ते तसं असणं अपरिहार्यच असतं.

मला स्वत:ला पहिल्या दोन फिल्म्स अधिक वेधक वाटल्या. (हया विधानात लपलेलं दुसरं विधान म्हणजे, पुढच्या दोन्ही फिल्म्स  तुलनेत अधिक निष्प्रभ वाटल्या, हे नाकारण्यात अर्थ नाही) आवडलेल्या दोन फिल्म्समध्ये पहिल्या क्रमांकावर मिता पंडीत आणि पाठोपाठ उदय शंकर असा अनुक्रम मी माझ्यापुरता लावेन त्यामध्ये उदय शंकर हा विषय मला अनेक वर्षांपासून अनेक अर्थानं कुतूहलाचा  होता.  लहानपणापासून एका  वेगळ्याच वलयातून जाणवलेला  आणि तरीही तसा दूरस्थच राहिलेला हा विषय असा साक्षात पहायला अनुभवायला मिळणं ही तशी अपूर्वाईच म्हणावी लागेल. खरं तर उदय शंकर ह्याचं एखादं मनावर ठसावं असं छायाचित्रही  पहाण्याचा योग आजवरच्या इतक्या दीर्घ आयुष्यात आला नव्हता. अर्थात मुद्दाम तसा शोध घेण्याचा प्रयत्नही झाला नव्हता हे अधिक खरं. पण आज ती सगळी कसर भरून निघाली. छायाचित्रातून, चित्रणातून, जवळून दुरून उदय शंकर अखंड दिसत राहिले त्यांच्या प्रतिमा ह्या चित्रपटातील अनेक  दृश्यं पहायला मिळाली... आणि आजवरच्या उणीवेची पुरेपूर भरपाई झाली.

उदय शंकर ह्यांच्या  पत्नी अमला शंकर ह्यांनी त्याच लघुपटात बोलताना उदय शंकर ह्याच्या समग्र अस्तीत्वाबद्दल  
Divine Existance असा शब्दप्रयोग केला.. तो अत्यंत समर्पक होता.. अशा काही दैवी कल्पनांचा वापर जाता येतां कुणी केला तर लगेच प्रभावित व्हावं हा माझा  मूळचा स्वभाव नाही आणि आता ती स्टेजही नाही. पण Black and white मधील उदय शंकर ह्यांचं ते चल आणि अचल दर्शन घडत असताना आपण सजीव मानव-स्वरूपात वावरणारा एखादा यक्ष पहातो आहोत असं खरोखरच भासत होतं.. पती-पत्नी हे दोघेही कलाकार असले तरी आयुष्यभर एकत्र सहजीवन हा बोलायला कितीही रोमांचक विषय वाटला तरी प्रत्यक्षात  अतिपरिचयात अवज्ञा हे एक अटळ वास्तव उरतंच.  त्या दिव्यातून पार पडल्यावरही ही Divine Existance ची प्रतिमा तितकीच उत्कट रहाणे ही नक्कीच मौल्यवान गोष्ट मानावी लागेल. फिल्ममध्ये  एकूणात मुलाखती तशा निवडकच होत्या.  त्यामध्ये उदय शंकर ह्यांची कलाकार कन्या ममता शंकर ह्यांचंही मनोगत येणं ओघानंच आलं.  त्यांना  आजच्या  प्रौढ पुरंध्रीरूपांत  पहाताना मला मात्र सर्वकाळ मृणाल सेन ह्यांच्या मृगयामधली कोवळी कृश षोडशी दिसत होती. आदिवासी स्त्री रूपातली; आपल्या प्रियकर पतीच्या धनुर्विद्याकौशल्याची प्रचीती गो-या आहेबाला देण्यासाठी धावपळ करणारी..  हे सगळं चालू असताना खरं तर अपेक्षितच  असलेली पण तरीही त्या क्षणी मला अनपेक्षित भासलेली एक गोष्ट घडली.  उदय शंकर ह्यांच्या स्नुषा तनुश्री शंकर ह्यांची मुलाखत सुरू झाली..  त्या साहजिकच त्यांचे संगीतकार पती आनंद शंकर ह्यांच्या विषयी बोलत होत्या.  त्या एका क्षणात इतका वेळ दूरस्थपणे समोर उलगडणारी ती फिल्म एकाएकी माझ्या व्यक्तिगत आयुष्याशी एका आंतरिक जिव्हाळ्याने  जोडली गेली.  कारण सुमारे एका तपापूर्वी आनंद शंकर आणि तनुश्री ह्या कलाकार दाम्पत्याला मी जवळून भेटलो होतो..  इतकंच नाही तर एका रंगमंचीय आविष्कारात त्या दोघाना मी माझा साक्षात सहभागही  दिला होता..

मला वाटतं, ते १९९७ साल होतं.  एका पटकथालेखन निमित्ताने मी ठाण्यात मुक्काम ठेवून होतो.  दिग्दर्शक रघुवीर कुलही माझ्याबरोबर होते. तिथे अचानक तेव्हाचे सांस्कृतिक सचिव (चूकभूल देणे घेणे) गोविंद स्वरूप ह्यांचा फोन आला.. ते वर्षं मराठी  चित्रपटाच्या पन्नाशीचं होतं. त्यानिमित्ताने त्या वर्षीचा महाराष्ट्र चित्रपट पारितोषिक सोहळा विशेष रंगतदार स्वरूपात  आखला जात होता..  तेव्हां ह्या चित्रपट  वाटचालीचा परामर्श घेणारं एखादं काव्य मी लिहावं., संगीतकार आनंद शंकर ते स्वरबद्ध करतील आणि तनुश्री शंकर त्यावर नृत्य-विरचनां सादर करतील, अशी ती कल्पनां होती. कल्पना निश्चितच वेधक होती.. पण हुरळून धावत सुटावं अशातली तो गोष्ट माझ्या दृष्टीनं नव्हती..  मी कविता लिहून पाठवतो, पुढे तुम्ही जे काय करायचं ते करां. मला म्युझिक सिटींगसाठी वेगळा वेळ देता येणार नाही हे मी प्रांजळपणे कळवून टाकलं आणि पाठोपाठ माझी कविताही गोविंद स्वरूप ह्यांच्याकडे पाठवून दिली ..ह्याचा अर्थ श्री. आनंद शंकर ह्यांच्याविषयी माझ्या मनांत आदर, आत्मीयता नव्हती असा मुळीच नाही.  पण तेव्हांची मनाची व्यग्रता वेगळी होती इतकंच...कविता मात्र माझ्या मनाजोगती झाली होती. ह्या निमित्ताने जे व्यक्त करावं असं वाटत होतं ते छान व्यक्त झालं हे समाधान मला पुरेसं होतं.  दोन दिवसांनी गोविंदजींचा फोन आला.. ते म्हणाले, कविता आनंद शंकरनां दिली आहे ..पण ते तुम्हाला एकदा व्यक्तिश: भेटू इच्छितात.  ह्यापूर्वीच्या, व्यवसायातील पुर्वानुभवामुळे मला एकूण ह्या प्रकाराचा जरा कंटाळाच आला होता...मुख्य म्हणजे कवी आणि कलाकार म्हणून माझे प्राधान्यक्रम बदलले होते.. जरा द्विधा मन:स्थितीतच आनंद शंकरनां फोन केला.. फोनवरचं त्यांचं बोलणं खूप मन:पूर्वक होतं.. आपका ज्यादा समय मै नही जाया करूंगा ..थोडा मिलेंगे ..बाते करेंगे तो मुझे सहायता मिलेगी.. 

एका सकाळी जुहू लोखंडवाला परिसरात त्यांच्या निवासस्थानी गेलो. ते नुकतेच मुंबईला स्थलांतरित झाले होते.. तनुश्री एका नव्या नृत्यप्रयोगाच्या तयारीसाठी अजून कलकत्यातच होत्या. आनंद शंकर सविस्तर भेटले.  मध्यंम उंची, सुखवस्तू शरीरयष्टी, गौर वर्ण, स्नेहशील प्रसन्न हास्य, सौम्य मुद्रा..   माणूस प्रथम भेटीत आवडला.. पण खरा चकीत झालो ते त्यांच्या पुढच्या बोलण्यामुळे .. माझी भेट हवी असण्यामागचे प्रयोजन ते सांगत होते.. बोलणं हिंदी आणि इंग्रजीची सरमिसळ असलेलं ..
त्याचा मितीतार्थ थोडक्यात असा होता...

सुधीरजी, ही म्युझिक आणि कोरिओग्राफीची ऑफर आली तेव्हां मला वाटत होतं ..टिपिकल फिल्मी समारंभ, त्यांत एखादं लोकगीत कोळी-नृत्य टाईप रूटीन काम असणार.. पण दोनतीन दिवसापूर्वी एका खाजगी फिल्मी पार्टीत गेलो होतो. दिलीपकुमारसारखी बुजुर्ग मंडळी होती.. त्या पार्टीत गोविंद स्वरूपजी भेटले ..त्यांनी हा कागद मला दिला. एका कोप-यात काही मिनिटात त्याचा एक जनरल कंटेंट मला थोडक्यात सांगितला.. पण तो ऐकताना मी सावध झालो.. मला एवढं लक्ष्यात आलं की ये तो सरासर पोएट्री है.. और बहोत तगडी पोएट्री है..  इसका म्युझिक करना और उपरसे उसको कोरिओग्राफ करना कोई बच्चोंका खेल नही ..ये बडी content वाली बात लगती है. तो कुछ भी सोचने से पहिले मुझे खुद पोएटकें साथ बोलना चाहिये ..खुद उनसे ये उनकी कहन पुरी समझ लेनी चाहिये, और इसलिये आपको ये तकलीफ दे रहा हू.. अब आप प्लीज खुदही ये आपकी कविता मुझे पुरी तरहसे समझा दिजीये.. मला हा एप्रोच खरोखरच अनपेक्षित होता.  सामान्यत: अशा प्रसंगातली नेहमीची  ओळखीची वाक्य अशी असतात..  हां ..कविता बघितली.. पण काय बरं कां  माझ्याकडे एक चाल बांधलेली तयार आहे. एकदम मस्त ठेक्याची.. त्यावर नाच आहे नां .. ..तर आपलं त्याच्यावरच काहीतरी तुमचं  जे काय असेल ते .. काय ? 

आणि मग खरोखरच आनंद शंकरजी ती कविता अथपासून इति पर्यंत छान समजावून घेतली.  प्रत्येक शब्दांच्या अर्थाच्या छटा रस घेउन समजावून घेतल्या.  कवि म्हणून माझी एक नेहमीची संवय आहे ..खरं तर ती एक भूमिकाच आहे.   त्या त्या ठिकाणची गरज नीट समजावून घ्यायची.. ती तर पूर्ण व्हायला हवीच .. पण तेव्हढ्यापुरतंचं लिहायचं नाही. .त्या घटनेमागील आणि गरजेमागीलही सगळा अवकाश ध्यानी घ्यायचा. ..आणि मग त्यातून उठलेले मनाचे तरंग शब्दातून वाहते करायचे.  तेच इथंही केलं होतं.

          स्वातंत्र्याच्या पंचपदीची बहरून येईल वेल
             छाया आणिक प्रकाश ह्यांचा
                      असा रंगू दे खेळ ..


ह्या पहिल्या ध्रुवपदावरचं आधी ते खूष झाले.  म्हणाले,   सुधीरजी, वैसे ये होनेवाली इव्हेंट तो सिर्फ फिल्म मिडीयम की है.. लेकिन आपने जॉ बात लिखी है वो  सिर्फ एकही मीडीयमकी नाही..  जॉ आज है और जॉ भविष्य में आनेवाले है उन सब ऑडियो व्हीज्यूअल फॉर्मकी बातका जिक्र इसमे है .... मै तो कहूगां, नाटक, नृत्य, लिटरेचर, पेंटिंग इन सभीकें साथ  ये शब्द जुड जाते है.. क्यो की  छाया और प्रकाश ये दो बाते तो सभीमे है.. छाया आणिक प्रकाश ह्यांचा असा रंगू दे खेळ...क्या बात है..  खरं तर आनंद शंकर ह्यांच्या हाती जाण्यापूर्वी ही कविता कितीतरी व्यक्तींच्या हातातून  गेली होती. पण तिचा असा सम्यक आस्वाद घेण्याची कृती कुणाकडून घडली असेल कां ? शंकाच आहे.  आणि तरी ती सर्व मराठी मंडळी होती.. ह्याउलट त्या काव्य सौंदर्याने मोहरलेला हां माणूस पूर्णपणे अमराठी होता..

कविता अशी समजून घेणं हां एक काव्यरसिक असण्याचा भाग झाला.पण त्या कवितेच्या   प्रत्यक्ष सादरीकरणाचा विचारही आनंद शंकरजीनी त्यांच बैठकीत नक्की करून टाकला. ते म्हणाले कवितेचा हां गंभीर खोल आशय हां समूहनृत्यातून व्यक्त होणं कठीण ..तेव्हां सम्पूर्ण कविता संगीतबद्ध न करता त्यातील नृत्याला अनुकूल असे केवळ तीन अंतरे त्यांनी निवडले आणि ते रेकॉर्ड करून  कोरिओग्राफीसाठी द्यायचं ठरवलं.  आणि पुढे त्यांनी सुचवलं की हां पुढचा सादरीकरणाचा भाग मंचावर येण्याआधी एक वाद्यमेळ केवळ पार्श्वभूमी म्हणून रेकॉर्ड करतो..  त्यावर तुम्ही स्वत: मंचावर येउन ही सम्पूर्ण  कविता सादर करा आणि त्यातूनच पुढची तनुश्रीनी बसवलेली कोरिओग्राफी सादर होईल..  खरं म्हणजे हया आधीपासूनच  कविता पानोपानी ह्या माझ्या प्रयोगात मी ध्वनिमुद्रित संगीतावर कवितेचं लयदार सादरीकरण करीत होतोच.  पण त्याची काहीही माहिती नसताना त्यांची संकल्पनां त्याच अंगानं जाताना पाहून मला मौज वाटली.. ह्या आधी प्रामुख्याने फ्युजनकार म्हणून मी आनंद शंकरना ओळखत होतो.  पण त्याक्षणी मला जाणवलं की आपण फक्त एका संगीतकार व्यक्तीला भेटत नाही आहोत.. सर्व कला माध्यमांची डोळस जाण  असलेल्या एका संवेदनाशील कलाकार व्यक्तीला भेटतो आहोत. जी व्यक्ती साक्षात उदय शंकर ह्या प्रतिभावंताची खरीखुरी थेट वारस आहे. नंतर अर्थात त्या सोहळ्यात योजल्याप्रमाणे ती कविता थाटामाटात सादर झाली.   निरोप घेताना  माझे दोन्ही हात आपल्या हातात धरून आनंद शंकर मला म्हणाले..  सुधीरजी, मिलते रहेंगे .. साथ काम करेंगे .. 

काळाच्या योजना वेगळ्याच असतात.  ह्या नंतर अल्पावधीत अचानक हृदयक्रिया बंद पडून आनंद शंकर हे जग सोडून गेले.. तनुश्रीही पुन्हा कलकत्याला परत गेल्या असणार.. कितीतरी वर्षांनी त्याना काहीशा  प्रौढ रूपांत पडद्यावर पहाताना माझ्या मनांत  ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्या एका क्षणार्धात, पडद्यावरचं ते नाद लयीचं यक्ष-जीवन माझ्यासाठी दूरस्थ राहिलं नाही.

Saturday 8 October 2011

स्वगत संवाद - १३


प्रिय,

आज हे लिहायला निमित्त आहे, ते एका केवळ चार ओळीच्या कवितेचं. ही कविता स्फुरली सुमारे दीड वर्षांपूर्वी ..  अगदी अलीकडे म्हणजे अगदी परवा परवा ती  अचानक आठवली .तुला ती नक्की आवडेल ह्याची खात्री होती.. आणि तसंच झालं. तेव्हाच म्हणालो होतो की ह्या कवितेची जन्मकथाही एकदा सांगेन म्हणून..  मग वाटलं की ह्या स्वगत संवाद माध्यमातून ह्या निमित्ताने ती सर्वांनाच सांगावी.. तर आज तो मूड लागला आहे. ..आमच्या लहानपणी अनावृत्त पत्र म्हणून एक प्रकार होता, तसं काहीतरी हे लिहिणं होतं आहे असं जाणवतंय. असो. तर आजचा विषय आहे, त्या चार ओळीच्या कवितेची जन्मकथा...

तसं पाहिलं तर आपणहून ही कविता मी लिहिली असती असं वाटत नाही.  आकाशवाणी पुणे केंद्राची मागणी म्हणून मुळात ती लिहिली गेली. पुणे आकाशवाणी आणि मी ह्यांचं हे नातं तसं खूप जुनं आहे.  अगदी, सखी, मंद झाल्या तारकापासूनचं... तेव्हापासून खूप गीतं मी पुणे आकाशवाणीसाठी लिहिली.  पण गेल्या काही वर्षात हा चार ओळीच्या मुक्तकाचा नवाच सिलसिला सुरू झाला आहे.  त्याचा आरंभ झाला तो पुणे आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षापासून.....  तेव्हाच्या केंद्राधिकारी उषा पागेनां त्याचं श्रेय द्यायला हवं. उषा साधी अनाउन्सर होती तेव्हांपासूनची आमची ओळख.. मी तेव्हां पुणे रेडियोवर केज्युअल आर्टिस्ट म्हणून यथेच्छ बागडत होतो. खूप मनमौजी मस्त दिवस होते ते..(तसे ते नव्हते कुठले म्हणा..) तर  त्या मैत्रीच्या अधिकाराने मला उषाने आकाशवाणी  पुणे केद्राचा सुवर्णमहोत्सव म्हणून चार ओळी लिहून दे असा आग्रहाचा आदेश दिला.  मी हो म्हणालो आणि जॉ गायब झालो तो आता ध्वनिमुद्रणाची तारीख अगदी  गळ्याशी आली तेव्हां उगवलो.  उषाचे सगळे सहकारी अधिकारी हवालदिल झाले होते..पण उषाचा माझ्यावर विश्वास होता आणि तो विश्वास खाली पडू देणे हे मलाही पटणार नव्हतं..  पर्यायानं त्या एका दिवसात मी त्या चार ओळी फर्मास लिहिल्या.. सुवर्ण महोत्सवासाठी म्हणून सुवर्णमुद्रा ही संज्ञा होती. तिचाच उपयोग करून मी त्या ओळी लिहिल्या ..  इतकच नाही तर तिच्याच आग्रहावरून संगीतकार म्हणून स्वरबद्ध करून त्या ओळी  रेकॉर्डही करून दिल्या..  अविनाश चंद्रचूडनं म्युझिक अरेंजमेंट केली आणि ते गाण्यासाठी  सलील कुलकर्णी, अंजली, जितेंद्र अभ्यंकर ही खाशी मंडळी होती. ते सम्पूर्ण सुवर्ण महोत्सवी वर्षं त्यानं गाजवलंचं. पण . आजही ते छोटूकलं गीत वारंवार प्रसाररित होत असतं.  खूप साधी पण प्रवाही अशी ती चाल माझी मलाही आवडते. गंमत म्हणजे अगदी रेकॉर्डिंगच्या वेळी त्या गीताच्या आरंभी ला ला ला ला  ..अशा अक्षरातून एक आलापी मला सहज सुचली.  नंतर स्मरणकोषाचा शोध घेतल्यावर ध्यानांत आलं की दिनकरराव अमेम्बलांनी वाद्यवृंदातून  ज्या सुंदर सुंदर धून बांधल्या होत्या, त्यातील नायकी कानडा रागामध्ये जी नितांत सुंदर धून आहे, त्यातून ते स्वर मी नकळत वेचले  होते. रेडियो हे मुळातच माझं फार लाडकं माध्यम आहे. शिवाय एक श्रोता आणि कलावंत ह्या दोन्ही नात्यानी माझी घडण रेडियोमाध्यमानं केली आहे, हे मला अभिमानान सांगावं असं वाटतं. त्याचीच परिणती म्हणजे ते छोटंसं मुक्तक ..

                    वारा उधळी सुगंध जगती अनंत हातांनी
                    त्या लहरीना जणू लाभली अमृतमय वाणी
                    शब्द-स्वरांची अखंड वाहे संजीवक धारा
                    लक्ष मनांवर.. 
                                 नभोवाणीची सुवर्णमुद्रा.  

हया गीतानंतर तशी एक मालिकाच सृरू झाली.  त्यातील अगदी अलीकडची रचना म्हणजे  तुला पाठवलेली ती चार ओळीची कविता, स्वदेश.. त्याचं झालं असं की पुणे रेडियोवरच्या प्रभा जोशी ह्या अभ्यासू प्रयोगशील व्यक्तीनं मला मुळात हे काव्य लिहिण्याची विनंती केली. विषय ऐकताच आवडला आणि म्हणून मी होकार देउन मोकळा झालो.. पण पुढे काय ? आम्ही वा-यावरचे  वारकरी ..ते थोडेच कुणाच्या हाती लागणार.. त्यातून प्रभा जोशी तशा सौम्य अनाग्रही .. शिवाय तशी घाईही नव्हती .त्या आपल्या अधून मधून फोन करायच्या. मी एव्हाना सर्वच विसरलेला असायचो. मग पुन्हा पहिल्यापासून सगळी उजळणी ..त्यावर आता देतोच असं माझं भरघोस आश्वासन आणि पुन्हा वां-यावरची वरात पुढे चालू.. असे दिवस नाही तर महिने गेले.  दरम्यान किर्लोस्कर शतक महोत्सव फिल्मनिर्मितीत आकंठ बुडालो आणि जणू स्वत:लाही विसरलो ..तिथं बापड्या ह्या कवितेचा काय पाड ? 

पुढील शूटिंगच्या आंखणीसाठी किर्लोस्करवाडीत मुक्काम ठेवून होतो. सोबत योगेश नांदूरकर त्याच्या काही कामानिमित्त आलेला होता..  कारखान्याचा सविस्तर फेरफटका, विविध अधिका-यासमवेत बैठकी अशी धामधूम चालली होती. लंचच्या आधीची शेवटची मीटिंग तर चक्क कारखान्याच्या प्रवेशद्वारापाशी चालली होती. तेव्हढ्यात फोन वाजला..  फोनवर आनंद मोडक हैराण स्वरात बोलत होता.. अहो कविराज, त्या बाई आता ऑक्सिजनवर आहेत..  उद्या सकाळी रेकोर्डीग ..परवा पासून पहिला ब्रॉडकास्ट देता नां ..  दरम्यान मी त्याबाबतच्या विस्मृतीत आपदमस्तक बुडालेला ..अपराधी स्वरात मी विचारलं .. सॉरी ..आनंद .. पण  विषय काय आहे ? .. त्यानं बहुधा तिकडे कपाळावर हात ठेवून पुन्हा एकदा तो विषय नव्यानं सांगितला.  खरोखर  तो विषय सुंदरच होता... परदेशी उच्च शिक्षण घेउन तिथेच दीर्घकाळ वास्तव्य व उज्वल भवितव्य असलेल्या पण तरीही मायदेशी परतून इकडे रुजण्याची जिद्द घेउन जगणा-या व्यक्तीच्या मुलाखती हा तो विषय होता..  आणि त्या मालिकेचं शीर्षक होतं, स्वदेश.. मला स्वत:च्याच ऐदीपणाचा जरासा रागच आला होता.  मी अजीजीच्या स्वरांत आनंदला म्हणालो.. आनंद, सॉरी. पण आज रात्री गेस्ट हाउसच्या माझ्या खोलीत तंद्री लावतो आणि काहीतरी तुकडा पाडतोच.  मग नेहमीप्रमाणे फोनवर डीक्टेट करीन. 

हे सगळं चालू असताना योगेश बरोबर होताच. तो आपला निमूटपणे सारं ऐकत होता.  व्ही. आय.पी. गेस्ट हाउसच्या डायनिंग हॉलमध्ये जेवण चालू केलं .. फिल्मच्या पुढच्या दुपारच्या कार्यक्रमाचे किडे डोक्यात होतेच.  काही क्षण गेले असतील, आणि मोबाईल वाजला.  फोनवर प्रभा जोशी होत्या.. त्यांनी काही बोलायच्या आंत मीच त्यांना आनंद मोडकशी झालेला संवाद सांगून आश्वस्त केलं.  हे असे संवाद ह्यापूर्वीही त्यांनी खूपदा ऐकले असल्याने त्यांच्या स्वरातली काळजी जराही ओसरलेली नाही हे मलाही जाणवत होतं.  मी फोन ठेवला .. काही क्षण गेले आणि एकदम पुन्हा मोबाईल उचलून प्रभा जोशींचाच नंबर फिरवला.. आणि मी एकदम म्हणालो,  प्रभाजी, काहीतरी डोक्यांत येतंय.. आनंदशी बोलून नंतर तुम्हाल फोन करावा असं वाटत होतं.  पण ऐकता जरा ?   माझं पुढचं बोलणं ऐकता ऐकता त्यांच्या स्वरातील आधीचे काळजीचे कभिन्न मेघ कुठल्या कुठे विरले आणि जणू काही, पाचूच्या हिरव्या माहेरी उन हळदीचे आले. त्याच टवटवीत स्वरात त्या म्हणाल्या .. मला तुम्ही म्हणाला होताच.  काही क्षण लागतील, पण ते क्षण केव्हा उगवतील ते सांगता येणार नाही.. पुन्हा सांगता ओळी ? मी उतरवून घेते.. आणि मोडकांनां देते..  अर्ध्या तासांत आनंदचा उत्फुल्ल फोन..  क्या बात  है कविराज,  म्हणून आम्ही तुमच्याकरता थांबतो, कितीही ..  तर प्रिय,  तीच ही कविता बरे... स्वदेश.. 
                जिथे जन्मतो सद्-भाग्याने .. त्याचे नांव, स्वदेश
                जिथे वाढतो आणि घडतो ..  त्याचे नांव, स्वदेश
                पृथ्वीच्या पाठीवर नंतर जां मग कोठेही
                पुन्हा पुन्हा जो तुम्हा बोलवी
                                        त्याचे नाव स्वदेश..  

इतका वेळ हे सगळं जे काही चाललं होतं त्याचा मूक पण डोळस साक्षीदार असलेला योगेश हळूच म्हणाला, हे काय आहे प्रकरण ? मग त्याला थोडक्यात कथासूत्र वन लाईन सांगावं तसा संक्षिप्त अहवाल दिला. तो पहातच राहिला.. आणि मग म्हणाला ..पण इतके दिवस न स्फुरलेल्या आणि आता काही क्षणांत थेट उद्गारासारख्या आलेल्या ह्या ओळी तुम्हाला कुठे सुचल्या ते तुमच्या कशात आलंय कां ? तुमच्या स्वदेशात ... अरे खरंच की..  मी ताडकन उडालोच. जिथे मी जन्मलो, वाढलो घडलो आणि पुढच्या आयुष्यात कलावंत म्हणून केलेल्या कमाईच्या अधिकारामुळ मोठ्या विश्वासानं ज्यानं मला पुन्हा जवळ बोलावून घेतलं आहे  त्या माझ्या जन्मगावात, किर्लोस्करवाडीत ह्या ओळी मला सुचल्या. पण म्हणजे ह्या मुहूर्तावर  जन्म घेण्यासाठी ही छोटीशी कविता खोळम्बून राहिली  होती की काय ? 

आणि मग स्वदेश ह्या शब्दाचा परीघ केवढातरी विस्तारत चालला.  आपला देश, आपला गांव, आपली भूमी, आपलं अवकाश, आपली पृथ्वी, इतकच नाही तर केवळ स्वत:चाच असलेला आपल्या आंतला परिपूर्ण  स्व  आणि  त्या स्व ने आपल्याला बहाल केलेला आपापला स्व-धर्मही..  पण म्हणजे हिंदू मुस्लीम सिख ईसाई तसला धर्म नव्हे.. तर विश्व स्वधर्म सूर्ये पाहो मधला तो स्वधर्म ... 

तेव्हां, प्रत्येक व्यक्तीचं चरित्र जसं आपापल्या परीनं रसमय, तशीच प्रत्येक  कवितेची जन्मकथाही स्वतंत्र, स्वयम्भू  स्वयंपूर्ण..   माझ्यापुरतं बोलायचं तर माझं आणि माझ्या कवितेचं नातं पुन्हा चार ओळीतच व्यक्त करता येईल.

                    मी कवितेची वाट पाहतो
                               माझ्या नकळत
                    अकल्पितातुन येते कविता
                                तिच्याहि  नकळत..