१९७० चं दशक माझ्या आयुष्यात फार महत्वाचं आहे. कारण तेव्हां पहिलं अत्यंत महत्वाचं स्थलांतर मी केलं.. जन्मगाव कायमचं सोडून पुणे मुंबईच्या विशाल विश्वांत आलो. त्यातून खूप छोटी मोठी परिवर्तनं झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे पुण्यात आल्यावरच माझ्यातील कवी प्रकर्षानं प्रकट होत चालला. ह्याआधीच्या जगण्याला व्यापून असलेलं नाटकवेड कसं कुणास ठाउक, ओसरत गेलं. गाणं सोबतीला राहिलं. पण त्यातही गायकापेक्षा आंत लपलेला संगीतकार अधिक कार्यरत होऊ लागला. पण ह्या सर्वाना वरचढ ठरला तो माझ्यातील इतके दिवस चुपचाप बसलेला कवी आणि गीतकार. पुढे मग त्यालाही किती किती शाखा फुटत राहिल्या. कला क्षेत्रातील विविध भूमिकां आणि विविध माध्यमं खुणावत राहिली आणि मीही त्यांच्या हाकांना प्रतिसाद देत राहिलो. पण त्या सर्वावर वर्चस्व राहिलं ते माझ्यातील कवीचं.
कवी झालो म्हटल्यावर रसिकांना आपली कविता थेट ऐकवण्याची तहान तल्लख होत चालली. परंतू एकीकडे कवी सम्मेलन ह्या लोकप्रिय प्रकाराची मात्र का कोण जाणे, बालपणापासून बहुधा जणू अंगभूत म्हणावी अशी एलर्जीच मला होती.. तिचं कसलंही समर्थन किंवा त्याविषयी बढाई हे लिहिताना मनात खरोखरच नाही ..पण कवि सम्मेलन नामक ओघानं येणारं व्यासपीठ मनाला ओढ लावत नव्हतं, हे मात्र खरं ..मग साहजिकच नाटकाच्या निमित्तानं आजवर ज्यावर बागडलो होतो तो रंग-मंच मी जवळ केला ..किंबहुना एकाअर्थी त्यानंच मला जवळ घेतलं आणि मला आपले शब्द-स्वरांचे प्रयोग करायला मनाजोगतं अंगण दिलं. अगदी ह्या आजच्या कवितासखी पर्यंत... पण ह्या कविता-सखीबद्दल काही बोलण्याआधी तिच्या उभारणीमागे पायाभूत असलेल्या तीन वळणाचा धांवता कां होईना पण मागोवा घ्यायला हवा.
तसं पहायला गेलं तर संकल्पना-संहिता आणि दिग्दर्शन ह्या नात्यानं मी मागच्या तीन दशकात रंगभूमीवर आणलेल्या शब्द स्वरांच्या प्रयोगांची एक मालिकाच उलगडेल. १९७१ मध्ये आपली आवड ह्या महाराष्ट्रातील पहिल्या भावगीत वृंदाचा पहिला सूत्रनिवेदक, १९७२ मध्ये स्वतंत्रते भगवती, १९७५ मध्ये मंतरलेल्या चैत्रबनात आणि कविता कविता कविता, १९७७ मध्ये आणिले टिपूनी अमृतकण, १९८१ मध्ये चिन्मय मिशनच्या पुणे शाखेनं साकार केलेला समर्थ रामदासांचा जीवनआलेख मांडणारा घ्वनि-प्रकाश समूह आविष्कार आनंदवन भुवनी, १९८४ मध्ये रॉय किणीकरांच्या अनवट कलंदर कवितेचा प्रत्यय देणारा उत्तररात्र, १९८९ मध्ये पहिल्या जागतिक मराठी परिषदेत साकार होऊन जगभर पोचलेला स्मरणयात्रा, २००३ मध्ये झी मराठी वाहिनीवर गाजलेली मालिका नक्षत्रांचे देणे ह्यातले शांता शेळके, कुसुमाग्रज आणि सुधीर फडके हे तीन प्रयोग, २००५ जानेवारीत ई टीव्ही साठी गदिमांच्या जन्मभूमीत २५ हजार रसिकांपुढे झालेला माडगुळ्याचे गदिमा आणि १९८७ ते थेट आजमितीप्रयन्त २४ वर्षे अव्याहत चाललेला माझा एकट्याचा एकल आविष्कार, कविता पानोपानी..
पण ह्या मालिकेतील केवळ तीन वळण आजच्या कवितासखी ह्या ताज्या प्रयोगाशी जोडलेली आहेत.. कारण कवितासखीप्रमाणेच ते तीनही प्रयोगदेखील, स्वत: कवीनं स्वत:च्या काविताचं घडवलेलं निखळ काव्यदर्शन होतं.. तात्पर्य, आपली आवड, कविता कविता कविता, कविता पानोपानी आणि कविता-सखी हे चार प्रयोग हा कवी आणि परफोर्मर म्हणून माझी झालेली घडण आणि त्या त्या वेळची माझी मानसिकता ह्यांचा एक धावता मागोवाच ठरेल अगदी थोडक्यात त्याचा परामर्श घ्यावा असा आजचा मनोदय आहे....
"सुधीर मोघे - कविता, गीते, संगीत, पटकथा-संवाद, दिग्दर्शन, गायन, रंगमंचीय आविष्करण... पण, मूळ पिंड 'कवी'चाच"
ReplyDeleteकेवढा आटोपशीर, पण सुस्पष्ट परिचय...!