Saturday 10 December 2011

स्वगत संवाद - २०

थोरला भाऊ

दादा माझ्यापेक्षा एका दशकानं वडील आहे. साहजिकच मी जेव्हा ९/१० वर्षांचा म्हणजे खऱ्या अर्थाने कळता होऊ लागलो, तेव्हा तो १९/२० च्या ऐन तारुण्यात पदार्पण करीत होता. तेव्हाचं त्याचं समग्र व्यक्तिमत्त्व सर्वार्थानं ‘नायक’ या संज्ञेला अनुरूप होतं. साहजिकच माझा पहिला आयडॉल पुढे कितीतरी र्वष तोच होता. छान उंची, पोलादाच्या कांबीसारखी कमनीय आणि लवचिक चपळ शरीरयष्टी, दाट कुरळे केस, रेखीव नाक-डोळे आणि आतील मृदू, संवेदनशील सुस्वभाव बिंबित करणारी तरतरीत प्रसन्न मुद्रा अशी रूपसंपदा त्याला लाभली होती. पण या सर्वापलीकडे हे बाह्य़रूपही कमी भासावं अशी गुणसंपदाही त्याच्याकडे होती.. तो सुंदर गायचा, सुरेख पेंटिंग करायचा, गणपतीच्या मूर्ती घडवायचा, भोवतालच्या खेडय़ातील जत्रांच्या फडात कुस्ती खेळायचा. पुढे एस.पी.त शिकताना एका वर्षी तो आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत बॉक्सिंग चॅम्पियनही होता. याच ओघात सांगावंसं वाटतं, की आमच्या दोघांच्या मधली बहीण हेमाताई हीदेखील  सर्वार्थानं त्याची बहीण शोभावी अशी होती. एस.पी.कॉलेजच्या स्नेहसंमेलनात जेव्हा श्रीकांत मोघे पु.लं.च्या ‘अंमलदार’चा नायक सर्जेराव म्हणून प्रचंड गाजले, त्याचवर्षी मुलींच्या ‘खडाष्टक’ नाटकाची नायिका हेमाताई होती आणि तिच्याबरोबर नायक कविश्वरच्या भूमिकेत होत्या, सरोजिनी वैद्य . तेव्हा सहज घडलेल्या या गोष्टी, पण पुढे आज इतक्या वर्षांनी त्या तपशिलात किती खुमारी निर्माण होते! पुढे हेमाताई आम्हा दोघांप्रमाणे पूर्ण वेळ कलाकार होऊ शकली नाही. पण तरीही तीही एक समृद्ध आयुष्य जगतेय. ‘उत्तम गुणाची मंडळी’ हे तिचं एकमेव पुस्तकही त्याची साक्ष देईल.
 
दादाचे हे सर्व गुण मानूनही तो जन्मजात अभिनेताच आहे, ही खूणगाठ मी माझ्या मनानं त्या बालपणीही स्वत:शी नकळत बांधून टाकली होती. पुढे ती सर्वार्थानं सिद्ध झाली. १९६० च्या दशकात आधुनिक मराठी रंगभूमीचं नवं व्यावसायिक पर्व सुरू झालं त्यातील आघाडीच्या पहिल्या फळीत श्रीकांत मोघे हे नाव एका स्व-अधिकारानं नोंदलं गेलं आहे. तिथपासून पुढची उणीपुरी ४०-५० र्वष ते नाव रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन या सर्व माध्यमांतून अखंड प्रकाशत राहिलं आहे. पण या प्रकाशझोतात येण्यापूर्वीचा धूसर प्रकाशातील त्याचा प्रवास एक अभ्यासू रसिक आणि धाकटा भाऊ या नात्याने मी खूप जवळून पहिला आणि अनुभवला हे मला नि:संशय माझं भाग्य वाटतं. चित्रपटाच्या भाषेत ज्याला ‘वन लाइन’ म्हणतात, तसा तो आधीचा प्रवास या क्षणी माझ्या डोळ्यांपुढे सरकतोय.
 
वयाच्या अवघ्या सातव्या-आठव्या वर्षी तो किलरेस्करवाडीच्या रंगभूमीवर पोवाडा म्हणायला उभा राहिला. एखाद्या अभिनेत्याला डोळ्यांपुढे ठेवून एखाद्या नाटककाराने नाटक लिहिणं ही अपूर्वाई असेल, तर पुढे  वसंत कानेटकरलिखित ‘लेकुरे उदंड झाली’ सारखं झळझळीत उदाहरण आहेच. ..पण तेच भाग्य या कलाकाराला अगदी बाळपणीही मिळालं, ही वस्तुस्थिती आहे. किलरेस्कर मासिकांचे सह-संपादक आणि दाजीकत्रे ना. धों. ताम्हनकर यांनी बालपणीच या चुणचुणीत मुलासाठी एक नाटक लिहिलं- पारितोषिक. त्या नाटकाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचं ते छायाचित्र आजही पाहण्यासारखं आहे.
 
सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजच्या पहिल्या वर्षीच योगायोगाने त्याची भेट पु. ल देशपांडे आणि सुनीताबाईंशी झाली. भविष्यातील एका प्रदीर्घ ऋणानुबंधाचा तो शुभारंभ होता. त्याच कॉलेजात त्यानं ‘लग्नाची बेडी’तला अवधूत झकास रंगवला. पुढच्या वर्षी पुण्याच्या एस.पी. कॉलेजात त्याचा ‘अंमलदार’ मधला सर्जेराव गाजला. इतका की, खुद्द पु.लं.नी स्वत:च्या गरहजेरीत त्याच्या नावाची शिफारस केली.
 
पुण्याची नामवंत नाटय़संस्था महाराष्ट्रीय कलोपासकने सादर केलेल्या मामा वरेरकरलिखित ‘अपूर्व बंगाल’ मध्ये त्यानं राखालची भूमिका केली आणि त्या वर्षीचं उत्तम अभिनेत्याचं राज्य पारितोषिक मिळवलं. त्याचवर्षी ते पारितोषिक मिळवणारी दुसरी दोन नावं होती- डॉ. श्रीराम लागू आणि विजया जयवंत. या सुमारालाच चित्रपटाचीही वाट उजळू पाहत होती. राजा परांजपे आणि ग. दि .माडगूळकर यांना त्याचं कौतुक होतं. एकीकडे व्ही. शांताराम यांच्या शाहीर प्रभाकरसाठी बोलावणं आलं होतं. पण मनाचे कौल काही वेगळे होते. म्हणून १९५७ साली तो थेट दिल्लीला गेला. दिल्लीतली चार-साडेचार र्वष खूप महत्त्वाची होती. त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला वेगळी झळाळी देणारी. दिल्लीमध्ये एकीकडे तो रेडिओवरून रोज रात्री आठ वाजता बातम्या देत आम्हाला आणि सर्व मराठी श्रोत्यांना भेटत होता आणि दुसरीकडे दिल्लीच्या मराठी आणिहिंदी रंगभूमीवर गाजत होता. तिथं ‘तुझे आहे तुजपाशी’त तो श्याम झाला, कारण तेव्हा तो आपादमस्तक श्यामच होता. ‘और भगवान देखता रहा’ या वरेरकर लिखित हिंदी नाटकात भोवतालच्या पंजाबी-उत्तर हिंदुस्थानी कळपात हा मराठा गडी हीरो झाला आणि यशाचा धनी ठरला. कर्नल हेमचंद्र गुप्ते दिग्दर्शक होते आणि त्या नाटय़प्रयोगाला पंतप्रधान पं. नेहरू, राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद आदींची उपस्थिती होती. देव आनंदच्या भगिनी श्रीमती कपूर (शेखर कपूरच्या मातोश्री) यांच्या इंग्रजी नाटकाचेही दौरे त्या काळात त्यानं केले. म्हणजे एकाच वेळी तो मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही मंचांवर वावरत होता.  पुढे एकदा प्रख्यात दिग्दर्शक राम गबाले मला सहज बोलताना म्हणाले होते, ‘अरे श्रीकांतचा त्या वेळी दिल्लीत काय आब होता, मी स्वत: पाहिलाय ना,’ याच सुमारास दिल्लीकर झालेल्या पु. ल. देशपांडेंनी त्याला आपल्या ‘कृष्णाकाठी कुंडल’मध्ये सहभागी करून घेतलं आणि भविष्यकालीन एका दिग्विजयी यशाची पेरणी केली.
 
१९६१ साली दिल्ली सोडून तो पुन्हा मुंबईत परतला तो पूर्ण वेळ कलाकार होण्याचा निर्णय घेऊनच. आवड होती म्हणून एकीकडे जे. जे. कॉलेजमध्ये वास्तुरचनेच्या अभ्यासक्रमाला आरंभ केला आणि दुसरीकडे पूर्णवेळ अभिनेता. त्याचवेळी ‘प्रपंच’ चित्रपट मिळाला आणि तीही वाट खुली  झाली. पाठोपाठ ‘वाऱ्यावरची वरात’ थाटामाटात आली आणि जणू भाग्योदयच झाला. तिथून त्यानं मागं वळून पाहिलंच नाही, ते आजमितीपर्यंत. अगदी थेट आजही नव्या नाटय़संपदेच्या नव्या नवलाईच्या वाऱ्यावरच्या वरातीचा दिग्दर्शक म्हणून तो जोमाने लढतोच आहे.
 
एकतर कीर्तनकार वडिलांचा फार संपन्न वारसा आम्हा सर्वच भावंडांना मिळाला आहे, पण तो केवळ आनुवंशिकतेचा भाग म्हणून नव्हे. अत्यंत सजग डोळस संस्कार जाणीवपूर्वक करणे आणि घेणे या एका अखंड प्रक्रियेचं ते फलित आहे. दादावरचे ते संस्कार त्याच्यामधील अभिनेत्यात थेट प्रतिबिंबित झालेले दिसतात. कुशाग्र बुद्धी, विस्मयजनक स्मरणशक्ती, सुस्पष्ट रसाळ वाणी, बहुश्रुतता आणि अजोड बहुरूपीपण ही त्याची बलस्थानं आहेत. नटवर्य नानासाहेब फाटक यांनी रवीद्र पिंगे यांना दिलेल्या एका मुलाखतीत दादाचा उल्लेख या पिढीतील सर्वागसुंदर नट म्हणून सर्व गुण-विशेषांसह केला आहे.
 
सुमारे दोन अडीच तपांच्या त्याच्या कारकीर्दीत त्यानं केलेल्या नानाविध भूमिकांतील काही मोजक्याच भूमिकांचा केवळ धावता मागोवा घेतला, तरी त्यातील आवाका पाहून मन अचंबित होईल. ‘तुझे आहे तुजपाशी’त सुसंस्कृत डॉ. सतीश, ‘सीमेवरून परत जा’मधील जगज्जेता सिकंदर, ‘बिकट वाट वहिवाट’मधला भाबडा रांगडा नाना गवळी, ‘लेकुरे’मधला दिमाखदार राजशेखर, ‘मृत्युंजय’मधला तामसी दुर्योधन, ‘गरुडझेप’ किंवा हिंदी ‘शेर शिवाजी’मधील धीरोदात्त शिवाजी राजे, ‘अश्वमेध’मधला आदर्शवादी प्रोफेसर, ‘संकेत मीलना’तला जगावेगळा प्रियकर. ‘वराती’तला कडवेकर , चा चा चा करणारा गावठी हीरो आणि ‘स्वामी’तला लाजवाब रसरशीत राघो भरारी पेशवे..  या सगळ्यांचा परामर्श हा एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय होईल.
एक धाकटा भाऊ म्हणून दादाविषयी मला काय वाटतं हे शब्दात सांगणं अवघड आहे. ‘हातसे छूकें इसे रिश्तों का इल्जाम न दो’ असं त्या भावनेबाबतीत म्हणावंसं वाटतं. ‘हीरो वरशिप’ (Hero worship) ते कठोर टीकाकार या सगळ्या भूमिकांतून मी त्याच्याशी जोडलेलो आहे. इतकंच नाही तर माझ्या वाटचालीतही त्याचा अखंड आधार मला मिळत राहिला आहे, हेही माझं भाग्यच. त्याचा प्रवास जवळून पाहताना मला माझी क्षितिजं शोधणं अधिक सुकर झालं. आपण सगळेच असंख्य गुणदोषांनी भरलेली माणसं असतो..
 
मग आम्ही दोघे तरी कसे आणि का अपवाद असणार? पण ते मान्य करतानाही दोघांमधील साम्यभेद सांगताना, तो माझ्यापेक्षा अधिक चांगला माणूस आहे, हेच मी पुन्हा पुन्हा म्हणतो. आयुष्यामध्ये मिळणारे लौकिक मानसन्मान हे केवळ सुखद योगायोग असतात. त्यांचा आनंद असतो आणि होतोही. पण हवं ते श्रेय मिळणं, न मिळणं अथवा तथाकथित कल्पनेनुसार उशिरा मिळणे यावर कलाकाराचं मूळ अस्तित्व कधीच आधारलेलं नसतं, ते जे काही मूळ असतं ते सूर्यप्रकाशाइतकं निर्मळ, सतेज आणि नि:संदिग्ध असतं. त्यामुळे अशा सर्व लाभाच्या क्षणीही आमची वृत्ती सहज, सुस्थिर असते. आजच्या आनंदाच्या क्षणीही आमच्या आतली मानसिकता तीच आहे.
 
पण या क्षणी खोल मनात दरवळणारा आनंद वेगळाच आहे. एक माणूस आणि कलावंत म्हणून तुमचा श्रीकांत मोघे आणि आमचा दादा एक खूप समृद्ध प्रदीर्घ आयुष्य जगत आहे. आजही त्याची ती दमदार वाटचाल सुरूच आहे आणि मोघे कुटुंबाच्या कलाकार-धर्माचा वारसा दादा-वहिनीच्या आणि अर्थातच पर्यायाने आमच्याही शंतनूच्या रूपाने पुढची आश्वासक वाटचाल करू लागला आहे, या दोन गोष्टी ही आम्हा जवळच्या सर्वाच्या दृष्टीने खरीखुरी कृतार्थतेची परिसीमा आहे.

No comments:

Post a Comment