Tuesday, 15 November 2011

स्वगत संवाद - १७


एरवी, जाता येतां भावूक किंवा रोमांचित व्हावं हा (कवी असूनही) माझा स्वभाव नाही.  पण तरीही खूपच वर्षांनी आज मी आनंदाने अंगावर फुलणारे रोमांच  अनुभवले.   ह्या वर्षीचा कवी केशवसुत पुरस्कार मला दिनांक ७ नोव्हेंबर रोजी नवीन कर्नाटक शाळेच्या सहाव्या मजल्यावरील नव्या अद्ययावत आणि सुसज्ज सभागृहात एका हृद्य सोहळ्यात देण्यात आला.. ह्या पुरस्काराचं हे पाचवं वर्षं होतं. ह्याआधी कविवर्य मंगेश पाडगांवकर, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे आणि ग्रेस ह्या कवीजनांनां हा सन्मान देण्यात आला होता.  हा दिवस माझ्या छोट्याशा व्यक्तिगत जीवनांत मला फार अनमोल आहे.  एखाद्या कार्यक्षेत्रात आपण प्रदीर्घ काळ सातत्यानं काही करीत राहतो, तेव्हां विविध पुरस्कारांनी सन्मानित होणं ही तशी ओघानं येणारी गोष्ट आहे. मीही त्याला अपवाद नाही.  १९७० ते २०१० ह्या चाळीस वर्षांच्या  माझ्या काव्यजीवनांत अनेक पुरस्कार माझ्या वाट्याला आले.  त्यातले केवळ महत्वाचे पुरस्कार ह्या निमित्ताने इथे ओघात आठवताहेत..  महाराष्ट्र राज्य पुरस्कार कवी गीतकार म्हणून मला चार वेळा मिळाले.  सूरसिंगार संसद ह्या नामवंत संस्थेतर्फे मी दोन वेळा सन्मानित झालो. रेडियो एंड टेलीव्हीजन प्रोड्यूसर्स असोसिएशनचं रापा एवोर्ड मला संगीत दिग्दर्शक म्हणून  मिळालं.  हे सगळे पुरस्कार स्पर्धात्मक स्वरूपाचे होते.  त्यानंतर मालिका सुरू झाली ती एकूण कारकीर्द ध्यानी घेउन दिल्या जाणा-या पुरस्कारांची ..  त्यातील पहिला गदिमा प्रतिष्ठानतर्फी नव्यानं सुरू झालेला चैत्रबन पुरस्कार मला पहिल्या वर्षीचा मिळाला. मराठी  साहित्य परिषदेचा  कविवर्य ना.घ.देशपांडे पुरस्कार, त्यानंतर कविवर्य राजा बढे आणि शाताराम आठवले ह्यांच्या नावाने सत्कार हे योग जुळून आले. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे  सुरू झालेला कवयित्री शांता शेळके ह्यांच्या नांवाचा प्रथम वर्षीचा  पुरस्कार मंगेशकर परिवारातर्फी मला  देण्यात आला. पाठोपाठ साहित्यकार गो.नी. दाडेकर ह्यांच्या स्मृतीचा मृण्मयी पुरस्कार मला लाभला.  आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर नुकत्या लाभलेल्या ह्या कवी केशवसुत पुरस्काराने जणू कळस चढला अशीच माझी भावना आहे.  कारण एक मराठी कवी ह्या नात्याने कविवर्य केशवसुतांच्या नांवाने गौरव होणे ही मला सर्वोच्च घटना वाटते.  आधुनिक मराठी कवितेचे उद्गाते कवी केशवसुत ह्यांचं  मोठेपण मी नव्यानं वेगळं काय सांगणार ? पण एरवी सुप्त स्वरूपात असलेला त्यांचा आणि माझा धूसर अनुबंध मात्र ह्या निमित्ताने जरा उलगडून पहावा असं वाटतं आहे.

 
कवी केशवसुत हे नांव आणि त्यांची कविता ह्यांची पहिली ओळख  मला खूपच बालपणी झाली.. तीही पुस्तकातून किंवा मासिकातून नाही.  ती कविता मला प्रथम भेटली ती माझ्या वडीलांच्या कीर्तनातून.  आमचे वडील, रांम गणेश मोघे व्यवसायांनं कीर्तनकार नव्हते..  कीर्तन हा त्याचा व्यक्तिधर्म होता. आज असं जाणवतं की त्यांचा मूळ पिंड आपादमस्तक कलावंताचा होता. आणि कीर्तन हे त्यांच्या बहुरूपी व्यक्तित्वाचा आविष्कार घडवणार एक प्रभावी कला-माध्यम म्हणून त्यांनी स्वीकारलेलं होतं.  काव्य, साहित्य, संगीत, नाट्य, भाषण-संभाषण, लेखन, वाचन, तत्वज्ञान ह्या सर्व विषयात त्यांना रुची होती आणि चांगली गतीही होती. जोडीला तर्कनिष्ठ, बुद्धिवादी विचारसरणी त्यांच्या मूळ स्वभावात होती..  किर्लोस्करवाडीच्या आधुनिक वातावरणात तिचं पुरेपूर पोषण होत होतं.  त्यामुळं त्यांच्या कीर्तनात संत-पंत काव्याबरोबरच आधुमिक मराठी कवितेचा सहज समावेश होत असे. तेव्हां केशवसुत त्यांच्या मुखी येणं ही ओघानंच येणारी गोष्ट म्हणावी लागेल.

             काठोकाठ भरू द्या प्याला
                    फेस भराभर उसळू द्या
             प्राशन करता  रंग जगाचे
                    क्षणोक्षणी ते बदलू द्या

ही त्यांच्या प्रत्ययकारी वाणीतून मी ऐकलेली कवि केशवसुतांची  पहिली कविता.. त्यानंतर त्यांच्या कितीतरी कविता कधी सम्पूर्ण तर कधी अवतरण किंवा सुभाषित म्हणून माझ्या कानांवर अखंड पडत राहिल्या..  चला रूढीवर आता घसरा..सीमोल्लंघन-कालची दसरा ..नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, झपूर्झा गडे झपूर्झा, कौशल्य सारे रचनेत आहे, साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे अशा कितीतरी ओळी आठवतात ..  ह्यांनंतर प्रकर्षानं आठवते ती शालेय पाठ्य पुस्तकात भेटलेली कविता , सतारीचे बोल... माझ्या मनावर पुढे पसरत गेलेली संगीताची मोहिनी ह्या कवितेतून प्रथमच  अधोरेखित होऊ लागली असावी.  संगीतातील नाद अक्षरात बाधू पहाणं हे एक आव्हानच असतं..  ह्या कवितेतील दीड दा, दीड दा ह्या अक्षरानी सतारीचे बोल साक्षात साकार केले आहेत, कदाचित कवितेच्या प्रवासात प्रथमच.

एक गंमतीदार योगायोग सांगायला हवां. पुढे किमान एक तपांनंतर मी स्वत: कवितेतून व्यक्त होऊ लागलो.  संगीत हा एव्हाना परम जिव्हाळ्याचा विषय बनला होता.  त्याची मनावर पडलेली मोहिनी सांगणारी तेव्हांची माझी एक कविता आठवते आहे. बहुधा ती माझ्या कुठल्याही संग्रहात नाही.. केवळ माझ्या स्मरणकोशात ती रहातेय..
              सूर कुठूनसे आले अवचित पथी जाता जाता
              उलगडल्या मानसी दिवाण्या स्वप्नधुंद लाटा

                      निर्विकार मन होते केवळ
                      तोच स्वरांचा आला परिमळ
              गंधित धूसर जादू घडली क्षणी बघता बघता

                      रूप स्वरांचे तरल .. अपार्थिव
                      कणाकणांतुन दुखरे आर्जव
               शब्दांपलीकडलेसे काही अस्फुट ये हाता .. 

                       त्या स्वप्नांच्या वाटेवरती
                       धूसर, स्वप्नील गाठी भेटी 
               अहेतुकाची प्रसन्न संगत अनाम मधुगीता

                        सूर भवतीचे सरले विरले
                        काळजात पण अक्षय उरले
                मनात ओल्या मृदुल स्वरांच्या लाटावर लाटा ..

पूर्णपणे व्यक्तिगत जाणीवेतून आलेली माझी ही कविता.. पण आज जाणवतं की सतारीचे बोल ह्या कवितेचं एक आधुनिक प्रतिबिंब म्हणजे ही कविता भासू शकते. पुढच्या पिढीचे अनुभव मागील पिढीच्या तुलनेत अधिक सूक्ष्म असू शकतात. कारण खापरपणजोबा, पणजोबा, आजोबा, वडील आणि मग आपण अशी ती एक माळ असते.  ह्या भाषेत बोलायचं तर सतारीचे बोल ह्या पणजीच्या खांद्यावर परंपरेने बसलेलं  पतवंड म्हणावी अशी ही कविता म्हणायला हरकत नाही.   पण कवी केशवसुत माझ्याही नकळत माझ्यात खरेखुरे खोल भिनले ते त्यांच्या कवितेतून नाही ..तर त्यांच्या एका गद्य लेखनातून .. ह.वि मोटे प्रकाशित विश्रब्ध शारदा हे माझं एक अत्यंत लाडकं पुस्तक आहे.  अठराव्या शतकातील उत्तुंग व्यक्तीचा खाजगी पत्रव्यवहार त्या पुस्तकात समाविष्ट केला आहे.  टिळक-आगरकर, आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी अशी ती पत्रं वाचताना मन तल्लीन होतं.  पण तरीही त्यातील एकच पत्र उचलायचं अशी कुणी अट घातली तर मी डोळे झाकून एकच पत्र उचलीन .. एका उदयोन्मुख कवीला लिहिलेलं केशवसुतांचं परखड पण तरीही जिव्हाळ्यानं भरलेलं छोटंसं पत्र .. ते मुळातूनच वाचायला पाहिजे. केवळ कवी नव्हे तर कुठल्याही कलावंत व्यक्तीची विशुद्ध पायाभूत भूमिका कुठल्याही काळांत काय असावी ह्याचं निदर्शक असं ते लेखन आहे.  त्या पत्रानं मी खराखुरा त्याच्याशी कायमचा जोडला गेलो अशी माझी भावना आहे.  आधुनिक कवि परंपरेचे ते मूळ पुरुष आहेत आणि आपण सगळे त्यांचे वंशज ही धारणा तिथपासून अंत:करणात खोलवर रुजली गेली... केशवसुत आणि मर्ढेकर ह्यांना ओलांडून जाणारं कवित्व अजून जन्मलेलं नाही हे निखालस सूर्य सत्य आहे.

पण तरीही कवितेतून त्यांच्या साक्षात्कारी शब्दांशी जोडलं जाण्याचा एक अनुभव अगदी अनपेक्षित रित्या साकार झाला, १९९५ साली.  अमेरिकेतील ह्यूस्टन इथं भरलेल्या मराठी संमेलनात मी विश्वाचा आहे ह्या शीर्षकाचा एक रंगमंचीय प्रयोग मी संहिता आणि दिग्दर्शक म्हणून साकार केला होता.  विख्यात छायाचित्रकार देबू देवधर तंत्र सहाय्यक म्हणून माझ्याबरोबर होता.  अमेरिकास्थित सुमारे १५० स्त्री पुरुषांनी त्यांत सहभाग दिला होता. त्यांत वय वर्षे आठ ते ऐंशी ह्या वयोमर्यादेतील व्यक्ती होत्या.  पहिल्या दिवशी सम्मेलनाचा शुभारंभ करताना आनंद मोडकनं स्वरबद्ध केलेली माझी एक कविता समूह स्वरूपात सादर झाली होती..  मी कालचा, मी आजचा, मी उद्याचा आहे ..मी मराठी, भारतीय मी, मी विश्वाचा आहे असा त्या कवितेचा मुखडा होता.  आणि समारोपाच्या वेळी मी विश्वाचा आहे हा रंगमंचीय प्रयोग सांगता म्हणून सादर झाला. मराठी माणसाचं एकूण भावविश्व शब्द आणि स्वरातून उलगडत नेण्याचा तो प्रयत्न होता. पण उत्तरार्धात मी हेतूपुरस्सर अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या तरूण  मुलामुलीच्या भावविश्वाचाही समावेश पाश्चात्य नृत्य आणि संगीतातून योजला होता.  कार्यक्रमाचा समारोप करताना सूत्र निवेदनातून तो विचार स्पष्टही केला होता.  भावविश्व हे स्थळ आणि काळ ह्यांचे कुंपण ओलांडून जात असतं  हे विसरून चालणार नाही . कारण तरच आपण आजच्या ग्लोबल संस्कृतीमध्ये जगतो आहोत हे सिद्ध होईल. आज आपण हे नव्याने बोलतो आहोत, असंही नाही .  हा नवा वैश्विक दृष्टीकोन खरं म्हणजे शंभर वर्षापूर्वी आपल्या एका मराठी कवीनं शब्दातून रेखाटून ठेवला आहे.... आणि ह्या शब्दांपाठोपाठ कवी केशवसुतांचे शब्द रंगमंदिरात घुमू लागले.

             जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत
             सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत
             कोठेही जा, पायाखाली तृणावृता भू दिसते
             कोठेही जा, डोईवरती दिसते नीलांबर ते
                     सांवलीत गोजिरी मुले
                     उन्हात हंसती गोड फुले
                     बघता मन हर्षून डुले
              ती माझी, मी त्यांचा ..एकच ओघ आम्हातून वाहे 

आणि इथे अगदी आपसूकपणे त्या कवीश्रेष्ठाच्या कवितेला हे नवागत शब्द जोडले गेले..

              मी कालचा, मी आजचा, मी उद्याचा आहे
              मी मराठी ..भारतीय मी
                                  मी विश्वाचा आहे

कवी केशवसुत पुरस्कार आयुष्याच्या  फार योग्य वळणावर मला लाभलाय असं मला अंत:करणपूर्वक वाटतं.  एक कलावंत म्हणून आपल्या वाटचालीच्या एका सर्वाधिक महत्वाच्या अंतिम टप्प्यावर आपण उभे आहोत असं मला क्षणोक्षणी जाणवतंय  अनेक  नव्या दिशांची अनोखी साद अखंड घुमते आहे. विचार आणखी विकार भावनांत पाझरे, मधू न त्यातला सरे, म्हणे न मीही त्या पुरे अशी एकूण मानसिकता आहे.. आज फिर जीनेकी तमन्ना है, आज फिर मरनेकां इरादा है ह्या ओळीचा खरा अर्थ अगदी आंतून पुरेपूर उमगू लागला आहे.  करण्यासारखं खूप दिसतं आहे आणि अवधी थोडा उरला आहे. एकीकडे नित्य नवा दिस जागृतीचा आणि दुसरीकडे रहना नाही, देस बिराना है असा मजेदार गोफ विणला जातो आहे. 

                   अशा ह्या दैवदुर्लभ क्षणी कवी केशवसुत,  तुम्ही मस्तकावर अगदी
                   अकल्पितपणे हा आशीर्वादाचा आश्वासक हात ठेवलात ..
                        खरोखर उमगत  नाही, काय बोलू ?

3 comments:

  1. Khoop Khoop abhinandan !!! Tumche' vichaar phaar aavadley aani Bhavana hridayala bhidlya ...

    ReplyDelete
  2. अभिनंदन.
    लेखही खूपच ह्र्द्य.

    ReplyDelete
  3. खालील कवितेच्या ओळी खूप छान आहेत .....
    निर्विकार मन होते केवळ
    तोच स्वरांचा आला परिमळ
    गंधित धूसर जादू घडली क्षणी बघता बघता

    ReplyDelete