Thursday, 1 September 2011

स्वगत संवाद - ८


गणेश चतुर्थी

मी अस्तिक आहे की नास्तिक ? ते मला ठाउक नाही.  हया दोन संज्ञाना जे रूढ अर्थ आपल्याकडे परंपरेने आले आहेत, त्या अर्थानी मी हे माझं विधान करतो आहे.  पण ते पारंपारिक अर्थ नाकारायचे ठरवले तर मात्र  मला भावणारा एक नवा अर्थ त्यांना लाभतो आणि मग ह्या प्रश्नाचं निश्चित उत्तर मी नक्की देउ शकतो.  गेल्या काही वर्षांपासून मी हे दोन शब्द positive आणि  negative ह्या अर्थाचे प्रतीक मानू लागलो आहे. आणि हे गृहीत धरलं तर मी नक्की अस्तिकच आहे. किंबहुना आपण सगळे मूलत: अस्तिकच, म्हणजे पोझिटिव्ह आहोत.  कारण तसं पाहिलं तर रोजच्या जगण्याबद्दल आपल्याला असंख्य तक्रारी आहेत ..पण तरीही आपण नेटाने जगत असतो.. आणि नुसते असेतसे नाही तर रोज नव्या उमेदीनं नवी स्वप्नं पहात आणि जगण्यातले छोटे मोठे आनंद घेत जगत असतो.  कदाचित कधी  आपण आपल्या प्राणांची किमत मोजून आत्महत्या करण्याचा निर्णय घेउ , नव्हे,  तर तो पारही पाडू तेव्हांच आपण खरे नास्तिक ठरू..  पण अतिशय दुर्लभ अपवाद सोडता आपल्या कुणालाच हे जमणार नाही, हे निदान स्वत:शी तरी कबूल केलेलं बरं.. नाही कां ? पण देव कल्पना आणि त्यातून येणारी भक्ती भावना ह्या गोष्टी पायाभूत धरून विचार केला तर मग माझी ही दुटप्पी भासणारी भूमिका जन्म घेते.. म्हणजे  मी नास्तिकही नाही आणि अस्तिकही नाही..  किंवा उलटपक्षी मी आस्तिकही आहे आणि नास्तिकही आहे.  

आपल्या भोवती पसरलेलं हे सगुण आणि निर्गुण विराट विश्वरहस्य ही माझी, माझ्यापुरती ईश्वर कल्पना आहे  किंबहुना परम ईश्वर ही शब्दाची फोड ध्यानी घेतली तर माझ्या दृष्टीनं परमेश्वर ह्या शक्तीचं अस्तित्व यापरतं दुसरं नाही  ह्या अर्थानं मी पूर्ण अस्तिक आहे.. पण मानव-निर्मित तेहतीस कोटी देव, त्यांचे अनेक उप-अवतार, त्यांची कर्मकांड, त्यातून उद्भवणा-यां नाना विकृत रूढी, त्यातील अमानुष कर्मठपणा ह्याचा  जन्मजात तीव्र तिटकारा जोपासणारा कट्टर नास्तिकही मीच आहे. मात्र  माझ्यातील आस्तिक्य भावनाना जन्म देणा-या त्या चिरंतन निर्गुण शक्तीचं सगुण रूप म्हणजे निसर्ग अशी माझी क्धीपासूंनची भावना आहे  पण  तरीही निसर्ग म्हणजे नक्की काय हा संभ्रम खूप काळ होताच. एकेदिवशी देबू देवधरकडून अचानक तेही उत्तर मिळून गेलं.  एका फिल्मच्या लोकेशन-संशोधन मोहिमेवरून परत येत होतो.. दोघेच होतो.  पाय मोकळे करायला थोडे थांबलो.. समोर सुरेख सूर्यास्त होत होता. देबू एकदम म्हणाला..   हा जो समोर लाल गोल  दिसतोय ना, तो माझा देव बरं कां.. ते केवळ काव्यमय बोलणं नव्हतं. एक निष्णात सिनेमाटोग्राफर आपलं लॉजिक सांगत  होता.  प्रकाश हे माझ्या कामाचं मूलतत्व ..आणि हा तर मूलभूत लाईट सोर्स.. म्हणून माझ्यासाठी हा आणि हाच देव. ईश्वर-स्वरूपाविषयी माझा संभ्रम त्यादिवशी कायमचा मिटला.  त्यादिवसापासून माझ्याही द्रष्टीनं माझ्या परमेश्वर कल्पनेचं समूर्त रूप एकच.. तेजाळ सूर्य..  रोज नेमाने उगवणारा-मावळणारा आणि तरीही उद्याही तो उगवणारच अशी एक अदम्य अस्तिक श्रद्धा तुमच्या आमच्या अंत:करणात कायम प्रदीप्त ठेवणारा हा सूर्य..

पूर्वी फर्ग्युसन हिलवरून त्याला रोज उगवताना डोळे भरून न्याहाळायचो.. अलीकडे एन.डी. रोडवरून तोच अनुभव घेत असतो. .अशावेळी, वडीलांच्या तोंडून अनेकदा ऐकलेलं, विश्वाच्या पांच मूळ तत्वांची आळवणी करणारं देववाणीतील  निसर्गसूक्त, मनांत घुमत असायचं..

                 पृथ्वी सगंधां, सरसस्तथाप:
                  स्पर्शश्च वायु: ज्वलनं सतेज:
                  नभ: सशब्दं. महतां सहैव
                  कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम

एके दिवशी अचानक तिचा मायबोलीतला प्रतिध्वनी अंत:करणात उमटला .. आणि परम सुखावलो.  आता माझी ती प्रार्थना रोज माझ्या मनांत घुमत असते.

                   पृथ्वी सगंधां..
                   सु-रसाळ पाणी
                   स-स्पर्श वारा ..
                   सतेज अग्नी
                   स-शब्द आकाश
                     ही थोर तत्वे
                     करोत रमणीय प्रभात माझी ..

Tuesday, 30 August 2011

स्वगत संवाद - ७

गेले काही वर्षापासून मराठी वाद्यवृन्द नामे क्षेत्रातील निवेदक ह्या जमातीत आपल्या बोलण्यात कविता वापरण्याची एक (स्वत:च स्वत:वर लादलेली) सक्ती आढळून  येते.  त्यांना दोष देण्यात अर्थ नाही.. कारण तब्बल चाळीस वर्षापूर्वी आमच्या स्वरानंद संस्थेनं आपली आवड हा पहिलावहिला मराठी वाद्यवृंद सुरू केला.. त्यामध्ये पहिला निवेदक (आजच्या भाषेत, सूत्र-संचालक) ह्या नात्याने मीच ही प्रथा सुरू करायला नकळत कारणीभूत झालो....  तो इतिहास मजेदार आहे..  निमित्ता-निमित्ताने आजवर सांगितला गेलेला आहे.. पण केवळ संदर्भ म्हणून इथे अगदी थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो...कारण मुख्य सांगायची आहे ती कविता निवेदनात समाविष्ट करण्यामागची विचार-प्रक्रिया.

साल १९७०.. नुकताच पुणेकर झालेला मी ह्या नव्या जगांत स्वत:ची एक जागा निर्माण करण्याच्या शोधात होतो... समोर दिसणारी दारं निमंत्रण देत होती. पण  काही ना काही कारणांनी मी त्यांना सन्मुख होत नव्हतो.. काहीवेळा तीही मला हूल देउन मिटत होती. अशा दोलायमन मन:स्थितीत मी लक्ष्मी क्रीडा मंदिरात झालेल्या आपली आवड ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या प्रयोगाला केवळ श्रोता म्हणून उपस्थित राहिलो.  ते दिवस हिंदी ऑर्केस्ट्राच्या भरभराटीचे होते.. त्या झगमगत्या पार्श्वभूमीवर उभा राहिलेला हा महाराष्ट्रातील पहिला मराठी वाद्यवृंद त्याच्या वेगळेपणामुळे आणि साधेपणामुळे मला खूप भावाला.  आणि मलाही कळण्याआधी मी त्यांत दाखल झालो.. निवेदक म्हणून.  ही भूमिका मला अगदी अनपेक्षित होती.

माझ्याआधी सुहास तांबे ते काम करीत होता.  सुहास देखणा होता, बुद्धिमान होता.. बहुश्रुत होता... उमेदीचा लेखक होता. 'डियर पिनाक', 'ती येते' ह्यासारख्या त्याच्या गाजलेल्या एकांकिका अजून क्षितिजाआड होत्या. पण ती चमक त्याच्या लिहिण्या बोलण्यात नक्कीच होती.  पण तरीही तो ह्या निवेदक भूमिकेत कम्फर्टेबल नाही असं दिसत होतं.  त्यालाही ते जाणवत होतं. एकदा प्रयोगानंतर त्यानं मला, माझं काय गडबडतंय म्हणून विचारलंही. मला तरी काय कुठे कळत होतं ?.. मी त्याला त्याच्या रंगमंचावरील हालचालीविषयी काही सुचवून पाहिलं ..पण त्याहून अधिक महत्वाची अशी एक गोष्ट मी नकळत मांडली होती.  तू प्रत्येक भावगीताआधी जे थोडं भावूक पण कृतक काव्यात्मक बोलतोस.. त्याहून काहीतरी थेट, ठोस पण तरीही ह्रदयाला भिडणार बोलायला हवं..  असं बोललो खरा, पण म्हणजे नेमकं काय हे मला तरी कुठे ठाउक होतं ? म्हणून ते आव्हान माझ्यावरच गुदरल्यावर मीही काही काळ गोंधळून गेलो.  पण हळू हळू धुकं निवळलं.

तेव्हां माझी रेडियो श्रवणभक्ती  ऐन जोसात होती. प्रामुख्याने रेडियो सिलोन, विविध भारती, रेडियो पाकिस्तान हे त्यांत होतेच. पण रोज दुपारी रेडियो दिल्ली केंद्रावरचा एक कार्यक्रम मी नियमित ऐकायचो. त्यांत आवडती हिंदी गाणी असायची. पण त्याहीपेक्षा माझं आकर्षण होतं ते दोन गाण्यांमधलं निवेदन.. ताजे तरूण स्त्री आणि पुरुष-स्वर चमकदार शेरोशायरीतून ती गाणी ओवीत जायचे. ते शेर पुढच्या गीतांच्या आशयाला कधी समांतर तर कधी वेगळाच अंदाज व्यक्त करणारे असायचे.. पण त्यातूनच पुढचं गीत हलकेच उमलून येतं आहे असं ऐकताना भासायचं.. मी हाच प्रकार माझ्या निवेदनात वापरायचा ठरवला. सुदैवानं विश्वानाथ ओकही ते कार्यक्रम ऐकत होता.. त्यामुळी त्यालाही माझी कल्पना पसंत पडली. पण तरीही आम्हा दोघानाही प्रत्यक्ष रंगमंचावर हा प्रयोग किती हिट ठरणार आहे, ह्यांचा अंदाज नव्हता.. १९७१ च्या नोव्हे-डिसेबरमध्ये माझ्या ताज्या टवटवीत  कविता घेउन रंगमंचावर उभा राहिलो. आणि त्या क्षणार्धात एका दीर्घकालीन लोकप्रियतेच्या लाटेवर आम्ही सगळे डौलात तरंगू लागलो.. स्वरानंद संस्था, आपली आवडच आमचा कलाकार चमू आणि अर्थात कवी=निवेदक म्हणून स्वत:, सुधीर मोघेही.

Monday, 29 August 2011

स्वगत संवाद - ६

गेले काही दिवस स्पेस (space) हा शब्द किंवा खरं तर ही संकल्पना माझ्या मनाचा ठाव घेउ लागली आहे. त्या शब्दाला मराठी प्रतिशब्द अवकाश असा आहे.

पण इंग्रजी-मराठी असा भेद  तरी का करायचा? कारण एव्हांना जे इंग्रजी शब्द मराठी भाषेत पूर्ण रुळले आहेत त्यातलाच हाही एक शब्द, स्पेस.  आजकाल व्यक्तिजीवनांत जे संघर्ष नव्यानं उभे राहताहेत आणि आपल्या पारंपारिक कुटुंब जीवनाच्या कल्पना झपाट्यानं ढासळू लागल्या आहेत, त्यांच्या मुळाशीसुद्धा हाच शब्द आहे.. आज प्रत्येकाला  आपली अशी स्पेस हवी आहे.  आणि तत्वत: विचार केला तर त्यांत काहीही वावगं नाही.

मी आज हे लिहू लागलो आहे, त्यामागेही अशीच काहीतरी खळबळ आहे.  पण त्या व्यक्तिगत गोष्टी बाजूला ठेवून ह्या स्पेस शब्दाची स्पेस जरा तपासून पहावी आणि एन्जॉयही करावी असं मनांत येतंय. पण म्हणजे आपल्याला आता स्पेस किंवा अवकाश ह्या दोन्ही शब्दात जरा खोल उतरायला हवं. आणि हा विचार मनांत आला की लगेच मातोश्री बहिणाबाईची ओळ आठवते...
मन एव्हढं एव्हढं
जसा खसखसचा दाणा
मन केव्ह्ढ केव्हढ
त्यांत आभाळ माईना..

म्हणजे जरा सूक्ष्मदर्शक कोन लावला तर दोन जिवलगांमधील श्वासांतर आणि मनांतरही..आणि तोच कोन  वाढवत नेला तर आपल्याभोवती पसरलेल्या विराट विश्वांचा कधी न संपणारा अमर्याद अज्ञात-वेधही .. अवकाश ह्या शब्दाची जाणीव मला जाणीवपूर्वक प्रथम झाली ह्याचं श्रेय विख्यात वास्तूरचनाकार आणि ललित लेखक माधव आचवल ह्यांना द्यायला हवं...  त्यांच्या एका दिसताना अत्यंत साध्यासुध्या भासणा-यां वाक्यानं रोजच्या आयुष्यातली एक नवी जागृती मला दिली .. दोन तळहात एकमेकांसमोर धरले की अवकाशाची मांडणी सुरू होते..  वास्तुरचनेसंदर्भात लिहिलेलं हे वाक्य उभ्या जीवनाचं  आणि जगातील सर्व कलाविष्काराचं मूलभूत सूत्र मानावं लागेल. 

प्रख्यात नर्तिका,गुरू आणि तत्वंचिंतक रोहिणी भाटे नृत्य-आविष्कार म्हणजे पुन्हा एकदा अवकाशाची पुंनर्माडणी असंच म्हणायच्या ..चित्रकारासमोरचा कोरा चित्रसोपान म्हणजेही एकाअर्थी त्याचा अवकाशच.  गायन-वादनातली स्वरांतरं आणि लय तत्वातील कणांतरं म्हणजेही एकाअर्थी अवकाशाची पुनर्रचनाच .नाट्य-चित्रपटात प्रतिभाशाली दिग्दर्शक आपल्या निष्णात तंत्रकुशल टीमच्या सहकार्यानं एकाअर्थी हा अवकाशवेधच  घेत  असतो.  कसलेला अभिनेता रंगमंचाच्या अवकाशात देहबोली आणि वाणी ह्या दोन आयुधांनी अवकाशतत्वाशीच क्रीडा करीत असतो.. आणि जगातले  सगळे क्रीडाप्रकार आपली नजरबंदी करतात तो हा अवकाशाचा खेळ खेळतच...हे सगळं नीट उमगलं की आपले रोजचे व्यवहारही भोवतीच्या अवकाशाशी संवाद साधत आपण पार पडत असतो हे उमगेल..  आणि सा-यां जगण्यालाच एक वेगळी ताजगी लाभेल .

हां, मात्र त्यासाठी स्वत:लाच जरा अवकाश द्यायला हवा
आणि आपला अवकाश डोळसपणे ओळखायलाही हवा.

Sunday, 28 August 2011

स्वगत संवाद - ५

स्वत: कवी व्हायला मी ब-यापैकी उशीर केला असला तरी कवितेवरचं माझं प्रेम मात्र अगदी बालपणापासूनचं.  शीघ्र-स्मरणाचा वारसा घरातूनच मिळाला होता. त्यामुळं कितीतरी जुन्या नव्या कविता, आणि कवी मला  तोंडपाठ होते.. डोक्यातही एकीकडे कवितेचं गुंजन अखंड चालू असायचं ..कविता वाचायला आवडायची तशीच ऐकायलाही आवडायची .त्यामुळं कवीच्या काव्यवाचनाचा किंवा काव्य-‘गायनाचा (त्याकाळी ह्याचं प्राबल्य जरा अधिक होतं) आस्वाद घेण्याची कुठलीही संधी मी चुकवीत नव्हतो. त्याचा आनंद मिळत होताच. पण तो शंभर टक्के निर्भेळ नसायचा. अर्थात ह्यालाही एक कारण होतं.
 
कवितेइतकीच रंगभूमी आणि संगीत ही क्षेत्रं प्रथमपासून आवडीची होती. त्यात सुदैवानं चांगली गतीही होती. त्यामुळं आस्वाद आणि सादरीकरण ह्या दोन्ही अंगांनी त्यांचाही आनंद खूप लुटत होतो. त्यातून साहजिकच अभिजात  performance हया गोष्टीची जाणीव आणि त्यातले निकष ह्यांचीही मनांत एक बैठक तयार होत गेली..

ह्या पार्श्वभूमीवर, काही सन्मान्य अपवाद वगळता, मला बहुतेक कवींच्या सादरीकरणात उणेपण जाणवायचं .. कधी त्यांच्यात अभिजात परफॉर्मन्सचा अभाव असायचा तर बहुतेक कवींच्या काव्य-गायनात संगीताच्या अंगानं असलेलं उणेपण खटकत रहायचं. ह्याउलट काही चांगले अभिनयकुशल कलाकार आणि गायक अनेक कवींच्या कविता फार सुंदर सादर करायचे. पण तो आनंद लुटताना, त्या सादरीकरणात स्वत: कवी धूसर राहून हे कलाकारच ठसठशीतपणे समोर येताहेत ही वस्तुस्थिती अस्वस्थ करायची.

थोडक्यात, चांगला सादरकर्ता, चांगला गायक आणि चांगला कवी ह्याचा साक्षात्कार एकाच व्यक्तिमत्वातून घडावा अशी एक वेगळीच तहान मनाला व्यापत चालली होती  पण पुढे आधी रंगभूमी, नंतर भाव-गायन आणि नंतर सर्वार्थानं शंभर टक्के कवी अशी स्वत:चीच वाटचाल झाल्यावर, ती माझी तहान आपल्या परीनं आपण तृप्त करू शकतो कां ह्याकॅं शोध घेणे ही गोष्ट जणू ओघानं आपसूकच उलगडत गेली ..

१९७१ मध्ये आपली आवड मध्ये सूत्र-निवेदन म्हणून कविता सादर करणं, १९७५ मध्ये कविता कविता कविता आणि १९८७ मध्ये कविता पानोपानी हे काव्य-प्रयोग साकार करणं आणि दीर्घकाळ चालवणं  हा सगळा प्रवास ही आजवरच्या  आत्म-चिंतनाची  आणि आत्म-प्रकटीकरणाची परिणती ठरते..  आणि   त्यातूनच आला आजचा हा, अभिजात शास्त्रीय गायनाच्या उपज-अंगानं जाउ पहाणारा माझा नवा लवचिक काव्य-प्रयोग,, .. कविता-सखी  

तेव्हां हा नवा प्रयोग उभा करायला किती अवधी लागला ह्या प्रश्नाचं ताबडतोब येणारं एक उत्तर, केवळ आठ पंधरा दिवस असं असलं तरी त्याचं दुसरं खरं उत्तर आजवर कलाकार आणि माणूस म्हणून जगलेलं समग्र आयुष्य हे आणि हेच असेल.

Friday, 19 August 2011

स्वगत संवाद - ४

१९७० चं दशक माझ्या आयुष्यात फार महत्वाचं आहे. कारण तेव्हां पहिलं अत्यंत महत्वाचं स्थलांतर मी केलं.. जन्मगाव कायमचं सोडून पुणे मुंबईच्या विशाल विश्वांत आलो. त्यातून खूप छोटी मोठी परिवर्तनं झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे पुण्यात आल्यावरच माझ्यातील कवी प्रकर्षानं प्रकट होत चालला.  ह्याआधीच्या जगण्याला व्यापून असलेलं नाटकवेड कसं कुणास ठाउक, ओसरत गेलं.  गाणं सोबतीला राहिलं. पण त्यातही गायकापेक्षा आंत लपलेला संगीतकार अधिक कार्यरत होऊ लागला.  पण ह्या सर्वाना वरचढ ठरला तो माझ्यातील इतके दिवस चुपचाप बसलेला कवी आणि गीतकार.  पुढे मग त्यालाही किती किती शाखा फुटत राहिल्या.  कला क्षेत्रातील विविध भूमिकां आणि विविध माध्यमं खुणावत राहिली आणि मीही त्यांच्या हाकांना प्रतिसाद देत राहिलो. पण त्या सर्वावर वर्चस्व राहिलं ते माझ्यातील कवीचं.

कवी झालो म्हटल्यावर रसिकांना आपली कविता थेट ऐकवण्याची तहान तल्लख होत चालली.  परंतू  एकीकडे कवी सम्मेलन ह्या लोकप्रिय प्रकाराची मात्र  का कोण जाणे, बालपणापासून बहुधा जणू अंगभूत म्हणावी अशी एलर्जीच मला  होती..  तिचं कसलंही समर्थन किंवा त्याविषयी बढाई हे लिहिताना मनात खरोखरच नाही ..पण कवि सम्मेलन नामक ओघानं येणारं व्यासपीठ मनाला ओढ लावत  नव्हतं, हे मात्र खरं ..मग साहजिकच  नाटकाच्या निमित्तानं आजवर ज्यावर बागडलो होतो तो रंग-मंच मी जवळ केला ..किंबहुना एकाअर्थी त्यानंच मला जवळ घेतलं आणि मला आपले शब्द-स्वरांचे प्रयोग करायला मनाजोगतं अंगण दिलं. अगदी ह्या आजच्या कवितासखी पर्यंत... पण ह्या कविता-सखीबद्दल काही बोलण्याआधी तिच्या  उभारणीमागे पायाभूत असलेल्या तीन वळणाचा धांवता कां होईना पण मागोवा घ्यायला हवा.

तसं पहायला गेलं तर संकल्पना-संहिता आणि दिग्दर्शन ह्या नात्यानं मी मागच्या तीन दशकात  रंगभूमीवर आणलेल्या शब्द स्वरांच्या प्रयोगांची एक मालिकाच उलगडेल. १९७१ मध्ये आपली आवड ह्या महाराष्ट्रातील पहिल्या भावगीत वृंदाचा पहिला सूत्रनिवेदक, १९७२ मध्ये स्वतंत्रते भगवती, १९७५ मध्ये मंतरलेल्या चैत्रबनात आणि कविता कविता कविता, १९७७ मध्ये आणिले टिपूनी अमृतकण, १९८१ मध्ये चिन्मय मिशनच्या पुणे शाखेनं साकार केलेला समर्थ रामदासांचा जीवनआलेख मांडणारा घ्वनि-प्रकाश समूह आविष्कार आनंदवन भुवनी, १९८४ मध्ये रॉय किणीकरांच्या अनवट कलंदर कवितेचा प्रत्यय देणारा उत्तररात्र, १९८९ मध्ये पहिल्या जागतिक मराठी परिषदेत साकार होऊन जगभर पोचलेला स्मरणयात्रा, २००३ मध्ये झी मराठी वाहिनीवर गाजलेली मालिका नक्षत्रांचे देणे ह्यातले शांता शेळके, कुसुमाग्रज आणि सुधीर फडके हे तीन प्रयोग,  २००५ जानेवारीत ई टीव्ही साठी गदिमांच्या जन्मभूमीत २५ हजार रसिकांपुढे झालेला  माडगुळ्याचे गदिमा आणि १९८७ ते थेट आजमितीप्रयन्त २४ वर्षे अव्याहत चाललेला माझा एकट्याचा एकल आविष्कार, कविता पानोपानी..

पण ह्या मालिकेतील केवळ तीन वळण आजच्या कवितासखी ह्या ताज्या प्रयोगाशी जोडलेली आहेत.. कारण कवितासखीप्रमाणेच ते तीनही प्रयोगदेखील,  स्वत: कवीनं स्वत:च्या काविताचं घडवलेलं निखळ काव्यदर्शन होतं..  तात्पर्य,  आपली आवड, कविता कविता कविता, कविता पानोपानी आणि कविता-सखी हे चार प्रयोग हा कवी आणि परफोर्मर म्हणून माझी झालेली घडण आणि त्या त्या वेळची माझी मानसिकता ह्यांचा एक धावता मागोवाच ठरेल  अगदी थोडक्यात त्याचा परामर्श घ्यावा असा आजचा मनोदय आहे....